
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेत वाकयुद्ध सुरू आहे. आता या संघर्षात काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी कंगनाला थेट भाजपची पोपट म्हटलं आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कंगनावर खोचक शब्दांत टीका केली. कंगना भाजपशी मिळालेली आहे हे मी आधीच सांगितलं होतं, असं म्हणत भाजप कंगनाला देशभक्तीचं प्रमाणपत्र देत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.कंगना राणौत भाजपची भाषा बोलत आहे. उद्या त्या भाजपच्या तिकीटावर राज्यसभेत किंवा विधान परिषदेवरही निवडून जातील आणि त्याचं मला आश्चर्य वाटणार नाही, असं वडेट्टीवार म्हणाले. ज्या मुंबई पोलिसांचं नाव जगात आहे. त्या पोलिसांवर विश्वास नसणाऱ्यांना देशभक्त म्हणून प्रमाणपत्र दिलं जात असून वाय दर्जाची सुरक्षाही दिली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीदेखील कंगनाला मिळालेल्या सुरक्षेवरून मोदी सरकारला लक्ष्य केलं. स्वत:चा अजेंडा रेटणाऱ्यांची काळजी भाजपचं सरकार घेत असतं. त्यामुळे अभिनेत्री कंगना राणौतला केंद्राकडून मिळालेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेचं आश्चर्य वाटत नाही, असी टीका सावंत यांनी केली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनीदेखील कंगनावर निशाणा साधला. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही. भाजप-संघाची भाषा बोलणाऱ्या कंगनानं महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.