खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते- श्रृती डोंगरे

0
40

गोंदिया,दि.30 : उत्तम आरोग्यासाठी खेळ आवश्यक असून अशा विविध खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय
एकात्मता निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक श्रृती डोंगरे यांनी राष्ट्रीय क्रीडा
दिनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले होते. यावेळी तालुका क्रीडा संयोजक विकास
कापसे, चेतन मानकर, विशाल ठाकुर, क्रीष्णा बहेकार, धनंजय भारसाकळे, माधुरी वानकर यांची प्रामुख्याने
उपस्थिती होती.
श्रृती डोंगर पुढे म्हणाल्या, बळकट शरीरात बळकट मन असते. खेळाच्या माध्यमातून आरोग्य निरोगी राहते.
त्यामुळे क्रीडा क्षेत्रात खेळांना जीवनात अनन्नसाधारण महत्व आहे. खेळाडूंनी खेळामध्ये सातत्य ठेऊन देशाचे नाव
उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद
गोंदिया, तसेच नेहरु युवा केंद्र व जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटना यांच्या संयुक्त वतीने 29 ऑगस्ट रोजी स्व.मेजर
ध्यानचंद यांच्या जन्म दिनानिमीत्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल,मरारटोली,गोंदिया येथे
करण्यात आले होते.
प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन ऑलम्पिक स्वर्ण कालखंडाचे शिल्पकार स्व.मेजर
ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरुन मार्गदर्शन करतांना क्रीडा अधिकारी ए.बी.मरसकोले म्हणाले, भारतीय
क्रीडा संस्कृतीचे जतन करुन त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. स्व.मेजर ध्यानचंद यांच्यापासून उदयोन्मुख
खेळाडूंनी प्रेरणा घेऊन देशाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत खेळाची जागृकता निर्माण करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी विकास कापसे, चेतन मानकर, धनंजय भारसाकळे यांनी जीवनात खेळाचे किती महत्व आहे
याबाबत आपले विचार व्यक्त केले.
केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोविड-19 महामारीच्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करुन
29 ऑगस्ट रोजी संपूर्ण जिल्ह्यात व्यापक स्वरुपात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार धनंजय भारसाकळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी शिवचरण चौधरी, विनेश फुंडे, रवी परिहार, जयश्री भांडारकर यांनी परिश्रम घेतले.