120 वर्षांत ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू नीरज चोप्रा याने आता जागतिक चॅम्पियनशिपमध्येही इतिहास रचला आहे. नीरजने बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम फेरीत त्याने ८८.१७ मी.च्या सर्वोत्तम प्रयत्नाने सुवर्ण यश संपादन केले.
ही चॅम्पियनशिप 1983 पासून आयोजित केली जात असून प्रथमच भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने रौप्यपदक जिंकले. त्याने 87.82 मीटर सर्वोत्तम भाला फेकला.जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भारताचे हे एकूण तिसरे पदक आहे. गेल्या मोसमात नीरजने रौप्यपदक जिंकले होते. महिलांची लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने 20 वर्षांपूर्वी 2003 मध्ये पॅरिसमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला
एकाच वेळी ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते. भारत सन 1900 पासून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे, परंतु नीरजपूर्वी, कोणत्याही भारतीयाने ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये सुवर्णपदक सोडा, कोणत्याही रंगाचे पदक जिंकले नव्हते. नीरजच्या आधी मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांची स्वतंत्र ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवणे ही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती.
पाकिस्तानच्या नदीमचे नीरजसाठी कडवे आव्हान
अंतिम स्पर्धेत, भारतीय स्टार नीरज चोप्राला त्याचा पाकिस्तानी प्रतिस्पर्धी अर्शद नदीमकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागला, मात्र नदीम नीरजला कधीही मागे टाकू शकला नाही.
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फोटो सेशनदरम्यान नीरज आणि कांस्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा याकुब वेडलेच आपापल्या देशांचा ध्वज घेऊन उभे होते. नदीमकडे पाकिस्तानचा ध्वज नव्हता. नीरजने नदीमला त्याच्याकडे बोलावले. नदीम नीरज चोप्राजवळ येऊन उभा राहिला आणि दोघांनी तिरंग्यासोबत एकत्र फोटो काढले.
जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज इतिहासातील पहिला भारतीय ठरला आहे. तर अर्शद हा या स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला पाकिस्तानी खेळाडू आहे. नीरजने अंतिम फेरीत 88.17 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले, तर अर्शदने 87.82 मीटर फेक करून रौप्यपदक जिंकले.
हांगझूमध्ये पुन्हा भेटू – नीरज
नीरज म्हणाला, ‘मी कार्यक्रमानंतर अर्शद नदीमला भेटलो आणि आम्हाला आनंद झाला की आमचे दोन्ही देश क्रीडा क्षेत्रात चांगले काम करत आहेत. आमच्या युरोपियन प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवल्याचा आम्हाला आनंद आहे. खेळांमध्ये दोन्ही देशांदरम्यान नेहमीच टक्कर असेल. मला वाटते या विजयानंतर चाहत्यांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या अपेक्षा वाढतील. आपण हांगझूमध्ये पुन्हा भेटू.’
पात्रता फेरीत मोसमातील सर्वोत्तम भालाफेक
पात्रता फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात नीरजने 88.77 मीटर लांब भाला फेकला. ती त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी होती. यासोबतच त्याला पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही मिळाले.
या वर्षी मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये नीरजने मोसमातील सर्वोत्तम 88.67 मीटरची कामगिरी केली होती. ऑलिम्पिक, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याबरोबरच 25 वर्षीय नीरज चोप्रा डायमंड लीग चॅम्पियनदेखील आहे.
गेल्या वर्षी रौप्य जिंकले
या चॅम्पियनशिपच्या गेल्या मोसमात नीरज चोप्राने ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले होते. ओरेगॉन येथे झालेल्या स्पर्धेत नीरज चोप्राने 88.39 मीटर भालाफेक केली. त्याने पदकासाठी भारताची 19 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली होती.