१३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य पदकासह सलग सहाव्या वर्षी विजेतेपद
मुंबई, दि. १५ जानेवारी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे १२ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान पार पडलेल्या १७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाने ९२ गुणांसह अंतिम विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांक मिळवला आहे. या संशोधन महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने नेत्रदिपक कामगिरी करून १३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई करत आविष्कार संशोधन स्पर्धेवर सलग सहाव्या वर्षी विजयी मोहोर उमटली आहे.
राज भवन आयोजित या संशोधन महोत्सवामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व २४ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक विद्यापीठ या स्पर्धेसाठी मानव्यविद्या, भाषा आणि कला; वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी; मुलभूत शास्त्रे; शेती व पशू संवर्धन; अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या प्रवर्गातून ४८ संशोधन प्रकल्प पाठविले जातात. मुंबई विद्यापीठाने या स्पर्धेसाठी ४८ संशोधन प्रकल्प सादर केले होते. मुंबई विद्यापीठाच्या ४८ पैकी २३ संशोधन प्रकल्पांना पारितोषिके मिळाली.
यामध्ये मुंबई विद्यापीठाने मानव्यविद्या, भाषा आणि ललित कला या प्रवर्गात ३ सुवर्ण, २ रौप्य, वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी या प्रवर्गात ३ सुवर्ण, ३ रौप्य, मुलभूत शास्त्रे या प्रवर्गात २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य, शेती व पशू संवर्धन या प्रवर्गात २ सुवर्ण, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या प्रवर्गात २ सुवर्ण, वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या प्रवर्गात १ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदक पटकावले आहेत. या सहाही प्रवर्गात गटनिहाय विजेतेपद प्राप्त केले आहे.
संशोधनाद्वारे समाजजीवन सुसह्य व आनंददायी करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या कल्पकतेतून आविष्कार आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, आणि अविष्कार स्पर्धेच्या विशेष कार्य अधिकारी डॉ. मिनाक्षी गुरव व समन्वयक डॉ. भूषण लांगी यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुंबई विद्यापीठाच्या या नेत्रदिपक कामगिरीसाठी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या संपूर्ण आविष्कार संशोधन स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. मनीष देशमुख आणि डॉ. वैशाली निरमळकर यांनी काम पाहिले. तर मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. शशिकुमार मेनन, प्रा. डॉ. सुनीता शैलजन, डॉ. मिनाक्षी गुरव, डॉ. भूषण लांगी, डॉ. रूपा राव, डॉ. मनीष देशमुख, डॉ. वैशाली निरमळकर, श्रीमती प्रज्ञा कोरलेकर, डॉ. दिलीप मोटवानी, डॉ. रसिका पवार, डॉ. नैना साळवे, डॉ. ललिता मुतरेजा आणि प्रा. विवेक बेल्हेकर यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत प्रथम बंडाबे, झनेटा रेमंड, राधिका भार्गव, श्रेयांस कांबळे, चैताली बने, कृष्णकांत लसुने, फरहीन शेख, विवेक शुक्ला, अंकित गोहिल, श्रावणी वाडेकर, तनिशा कौर, प्रतिक मेहेर, आणि वैष्णवी परब यांनी सुवर्ण पदक पटकाविले. रौप्य पदक अथर्व लखाने, चैत्रा देशपांडे, मंगलम लुनकर, ऋतुजा शिंदे, विरा जैन, आभाश शर्मा आणि मानसी झा यांना प्रदान करण्यात आले. समृद्धी मोटे, तेजश्री जायभाये आणि श्रेया गर्गे यांना कांस्य पदक मिळाले.
“संशोधनाच्या क्षेत्रात मुंबई विद्यापीठाने सलग सहाव्या वर्षी केलेल्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे आज राज्य स्तरावर मुंबई विद्यापीठाचा नावलौकीक होतो आहे, हे कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी संशोधन, नावीन्यता आणि कल्पकतेच्या जोरावर आविष्कार सारख्या संशोधन स्पर्धेतील यशाने मुंबई विद्यापीठाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. आम्हाला या विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान असून मुंबई विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांच्या या संशोधन प्रकल्पांना स्टार्ट-अप मध्ये रुपांतर करण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य केले जाणार ” – प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ)