
वृत्तसंस्था
रिओ, दि. १९ – भारताचा अव्वल कुस्तीपटू नरसिंग यादव याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.ब्राजीलच्या कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सने (सीएएस) चार तास चाललेल्या युक्तीवादानंतर नरसिंग यादव डोपिंगमध्ये दोषी आढळल्याने त्याच्यावर ऑलिम्पिकसाठी पुढील चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय दिला. तसेच, त्याची रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची परवानगी सुद्धा नाकारली आहे.
विशेष म्हणजे दोन दिवसापुर्वीच जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) केलेल्या अपीलवर केलेल्या सुनावनीनंतर क्रीडा लवादाने नरसिंग यादवला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली. ‘वाडा’ने याआधी राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) नरसिंगला डोपिंगबाबत दिलेल्या क्लीनचीटविरोधात अपील केले होते. परंतू, क्रीडा लवादाने याबाबत नरसिंग यादवच्या बाजूने निकाल देताना सर्व भारतीयांना दिलासा दिला होता.
मात्र, आता कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सने नरसिंग यादववर चार वर्षांची बंदी घालण्याचा आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग न घेण्याचा निर्णय दिल्याने त्याचे रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.