‘अद्रका’ची शेती दोन एकरावर, उत्पन्न मिळाले १० लाखांवर

0
32

अवकाळी पाऊस, निसर्गाची अनिश्चितता, नापिकी, वातावरणातील बदल यामुळे पारंपरिक शेती अडचणीत आल्याचे चित्र एकीकडे असताना महाराष्ट्रातल्या नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी जितेंद्र पाटील यांनी असाच एक प्रयोग केला आहे. पावणे दोन एकरात आले (अद्रक) शेतीच्या प्रयोगातून लाखोंची कमाई, जितेंद्र पाटलांनी करून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.

महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे. शेतकरी जितेंद्र पाटील यांनी असाच एक प्रयोग केला आहे. पारंपरिक शेतीमध्ये अनेकदा फायदा कमी आणि नुकसान जास्त होते. पांरपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकरी विविध प्रयोग करत असतात. काही शेतकऱ्यांनी तर मिश्र शेतीकडे मोर्चा वळवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने मिरचीच्या शेतीला प्राधान्य देतात. हा जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश सीमेपासून जवळ असल्यानं शेतकऱ्यांना देखील तेथील बाजारपेठांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याचं दिसून येतं. नंदुरबार जिल्ह्यातील जितेंद्र पाटील या शेतकऱ्यानं आले शेतीतून लाखो रुपयांची कमाई करत शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधलाय. पाटील यांनी दोन एकरात १६ टन आल्याचं उत्पन्न घेतलं आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रासह, गुजरात, मध्यप्रदेशच्या व्यापाऱ्यांकडून जागेवरच त्यांच्याकडून चाळीस रुपये प्रति किलोनं हे आले खरेदी केली जात आहे.

शेती हा बिनभरवशाचा व्यवसाय आहे. मात्र, शेतीकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलला तर शेतीतूनही चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते हे जितेंद्र पाटील यांनी दाखवून दिले आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी जितेंद्र पाटील यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी आले (अद्रक) शेती करत शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे.

जितेंद्र पाटील यांच्याकडे एकूण १४ एकर जमीन असून त्यांची काही जमीन त्यांच्या गावाजवळ आहे. गावाजवळ असलेल्या जमिनीत पाळीव, जंगली प्राणी आणि अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, वातावरणातील बदल यासारख्या कारणांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. त्यामुळे त्यांनी पावणे दोन एकर जमिनीत काही नवीन प्रयोग करण्याचे ठरविले. पाटील यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत कृषी विभाग व नंदुरबार येथे नव्याने निर्मित शासकीय कृषी महाविद्यालयातील तज्ञांच्या मदतीने आले शेती करण्याचे नियोजन केले

श्री. पाटील यांनी आले बियाणे नाशिक येथून वीस रुपये किलोने खरेदी केले होते. आता त्यांनी आपल्या शेतातून आले काढण्यास सुरुवात केली आहे. मध्य प्रदेश मधील व्यापारी जागेवर चाळीस रुपये किलो दराने त्यांच्याकडून आले खरेदी करत आहेत. पाटील यांनी लागवडीपासून काढणीपर्यंत दोन लाख रुपयांचा खर्च केला आहे. दोन एकरात दहा लाखापर्यंतचं उत्पन्न मिळालं आहे. खर्च वजा जाता आठ लाख रुपये निव्वळ नफा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बाजारपेठेचा अंदाज पाहून शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास शाश्वत उत्पादनाचा मार्ग खुला होत असतो, असं जितेंद्र पाटील म्हणाले, बाजारपेठेत ‘आले’ म्हणजेच अद्रकला चांगली मागणी असते, हे लक्षात घेवून पारंपरिक पिकांना फाटा देत जितेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर एक नवीन आदर्श उभा केला आहे.

थोडक्यात महत्त्वाचे

* पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वाटचाल.

* क्षेत्र पावणेदोन एकर, खर्च ₹ २ लाख, उत्पन्न ₹ १० लाख.

* कृषी विभाग व शासकीय कृषी महाविद्यालयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन.

* महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरातमधील व्यापाऱ्यांकडून जागेवरच खरेदी.

* शेतीच्या नव्या प्रयोगातून गवसला शाश्वत शेतीचा मूलमंत्र.

 

रणजितसिंह राजपूत,
जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार