: महिला दीन विशेष
भंडारा,दि.08 :भंडारा जिल्ह्यातील खमारी बुट्टी येथील रहिवासी कु. प्राची दुर्गा केशव चटप या तरुण खेळाडूने भारतीय आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडिया च्यावतीने भारतीय महिला आट्यापाट्या या संघाची कर्णधार च्या नेतृत्वाखाली टिम च्या परिश्रमामुळे आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत विश्वचषकावर भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. तिच्या या यशाने संपूर्ण देशाला अभिमान आहे. परंतु तिच्या या यशामागे अथक परिश्रम, जिद्दीचा आणि अनेक अडथळ्यांवर मात करण्याच्या धैर्याचा मोठा वाटा आहे. प्राची चटप चा हा प्रवास केवळ तिच्या वैयक्तिक यशापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण समाजासाठी आणि विशेषतः मुलींसाठी एक प्रेरणादायी संदेश आहे.
ग्रामीण भागातील मुलींना खेळात यश मिळविण्यासाठी केवळ शारीरिक मेहनतच नाही तर मानसिक आणि सामाजिक अडथळ्यांचाही सामना करावा लागतो. प्राची चटप ने हे सिद्ध केले की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांनाही साकार करता येते. भंडारा जिल्ह्यातील खमारी बुट्टी या ग्रामीण भागातून येऊन तिने जिल्हा, महाराष्ट्र संघाची कर्णधार राहुन अनेक पदके पटकावली आहेत. भुतान येथे ८ व्या दक्षिण आशियाई महिला आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय टीमची कर्णधार होती. तिच्या व टिमच्या कुशल नेतृत्वाने भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर समाजातील प्रत्येक क्षेत्रात मुलींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
प्राची ही तीन वर्षाची असतांना वडील केशव चटप यांचे अपघाती निधन झाले. तेव्हा आई दुर्गा चटप हीने मुलगा विवेक व मुलगी प्राची यांचे नाव खमारी बुट्टी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दाखल केले. आईने मोलमजुरी करून कूंटुबाचे पालनपोषण केले. राहायला घर नाही कसायला शेती नाही. आणि किरायाच्या दहा बाय दहा च्या खोलीत राहून संसाराचे गाडे ओढले. घरात अठरासेवीस दारिद्र्य असून सुद्धा मुलांना शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रात अग्रेसर केले. अशा आईच्या कार्याला सुद्धा सलाम!
आट्यापाट्या खेळ हा केवळ शारीरिक व्यायामाचा मार्ग नाही तर तो व्यक्तिमत्त्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. खेळामुळे आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता विकसित होते आणि नेतृत्वगुण आत्मसात करता येतात. परंतु समाजातील पारंपरिक विचारसरणी अजूनही मुलींच्या खेळात सहभागाला मर्यादा घालते. ‘खेळ हे मुलांसाठीच आहेत’ किंवा ‘मुलींनी घरकामावर लक्ष केंद्रित करावे असे विचार अजूनही अनेक कुटुंबांमध्ये रुजलेले आहेत. प्राची च्या यशाने या विचारांना छेद देत हे सिद्ध केले की, मुलींना संधी दिल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात.
तिच्या यशामागे तिच्या कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे. कुटुंबाचा आधार हा कोणत्याही खेळाडूसाठी यशाचा पाया असतो. मुलीना खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवणे. त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. प्राची चा हा प्रवास या सर्वांसाठी उत्तम आदर्श आहे.
खेळात मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील आणि महाविद्यालयांनीही पुढाकार घेतला पाहिजे. शाळांमध्ये क्रीडा स्पर्धा, क्रीडा शिबिरे आणि मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविले गेले पाहिजेत. महिला प्रशिक्षकांची नेमणूक करून मुलींना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे आवश्यक आहे. तसेच सरकारने महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासांठी जाहीर केलेल्या योजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील मुलींना खेळासाठी विशेष योजना आखून त्या प्रभावीपणे लागू केल्या गेल्या पाहिजेत. प्राची चटप चा हा विजय केवळ तिच्या अथक मेहनतीचा नाही तर तो समाजातील सकारात्मक बदलाचा सूचक आहे. तिच्या यशाने अनेक मुलींना नवी प्रेरणा मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील मुलींना तिच्या या कामगिरीने आत्मविश्वास मिळाला आहे. तिच्या यशाने ने हे सिद्ध केले आहे की, खेळात मुलींना संधी दिल्यास त्या संधीचे सोने करण्यासाठी आपल्या कौशल्याने आणि चिकाटीने जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावू शकतात.
प्राची चटप च्या यशाने महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेण्याची गरज अधोरेखित केली आहे. महिला खेळाडूंना योग्य प्रसिद्धी मिळाल्यास त्यांना अधिक प्रोत्साहन मिळू शकते. माध्यमांनी महिला खेळाडूंच्या यशाला वाचा फोडून त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे.
प्राची चटप च्या या प्रवासाने समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. मुलींना प्रोत्साहन द्या त्यांना स्वप्न पाहण्याची आणि ती साकार करण्याची संधी द्या. खेळ हा केवळ मनोरंजनाचा किंवा स्पर्धेचा भाग नाही, तर तो व्यक्तिमत्त्व विकासाचे एक साधन आहे. समाजाने मुलींना खेळात सहभागी होण्यासाठी समान संधी उपलब्ध करून दिल्यास देशातील क्रीडा क्षेत्र अधिक प्रगत होईल.
शिक्षण किंवा क्रीडा क्षेत्रात भरारी मारण्यासाठी अनेक अडचणी येत असतात. त्यावर मात करण्यासाठी तळमळ अंगात असावी लागते. गोरगरीब जनतेच्या मदतीला कोणीच धावून येत नाही. मात्र श्रीमंत, राजकीय लोकांच्या पाठिसी अनेक असतात. देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी मिळाली म्हणून मला आनंद झाला. मात्र जाण्यासाठी पैसे नाही. अनेक लोकप्रतिनिधी कडे मदतीची याचना केली. त्यावेळी कोणीही मदत केली नाही. मात्र खेळाडूंनी योग्य खेळाचे प्रदर्शन करून जिल्हा, राज्य व देशाचे नाव लौकिक करावे. अशाप्रकारे मार्गदर्शन करत असतात. नको असलेल्या ठिकाणी वाटेल तेवढा पैसा खर्च करतात. मात्र एखाद्या खेळाडूला अशाप्रकारे अनुभव येतात याबद्दल काय बोलावे ?
‘भंडाराची लेक विश्वात एक’ हा केवळ यशाचा घोष नाही, तर तो संपूर्ण समाजासाठी एक जागरूकतेचा संदेश आहे. मुलींना प्रोत्साहन दिल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात. प्राची चटप च्या यशाने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे. आणि तिच्या या प्रवासाने समाजातील प्रत्येकाला विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. आपण मुलींना खेळण्यासाठी, स्वप्न पाहण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी किती प्रोत्साहन देतो? प्राची चटप चा हा प्रवास एका नव्या सुरुवातीचा संकेत आहे. तिच्या यशामुळे खेळात मुलींच्या सहभागाला चालना मिळेल हे खरे.