यशोगाथा –उद्योग यशाची नवी ज्योत
वाशिम येथील एमआयडीसी प्लॉट क्र. बी–१२ येथे कार्यरत असलेले अतुल अंबादास भुतकर हे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत यशस्वी उद्योजक म्हणून पुढे आले आहेत. श्री. भुतकर हे ओबीसी प्रवर्गातील असून त्यांनी ‘फायर विंग्स इग्निशन सिस्टिम्स सोल्यूशन’ या औद्योगिक घटकाची स्थापना केली आहे.
प्रारंभी सुमारे दोन वर्षे त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून व्यवसाय सुरू ठेवला होता; मात्र मर्यादित भांडवल व संसाधनांच्या अभावामुळे अपेक्षित यश मिळू शकले नाही. तरीही खचून न जाता त्यांनी नव्या उमेदीने व्यवसाय उभारणीचा निर्णय घेतला.
त्यांना महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत, उद्योग संचालनालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा उद्योग केंद्र, वाशिम येथे अर्ज केला. या योजनेअंतर्गत त्यांच्या उद्योग प्रकल्पास ३० लाख इतका प्रकल्प खर्च मंजूर झाला. सदर प्रकल्पासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, वाशिम शाखेकडून त्यांनी बँक कर्जाची सुविधा प्राप्त केली. या आर्थिक सहाय्यामुळे उद्योगाच्या यंत्रसामग्री, कार्यपद्धती व उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ झाली.
आज फायर विंग्स इग्निशन सिस्टिम्स सोल्यूशन हा उद्योग यशस्वीरीत्या कार्यरत असून स्थानिक पातळीवर चांगली ओळख निर्माण केली आहे. उद्योगातून दर्जेदार उत्पादने निर्मिती होत असून बाजारपेठेत त्यास चांगली मागणी आहे. या उद्योगातून सध्या सुमारे ₹१ कोटी वार्षिक उलाढाल होत आहे, जी उद्योगाच्या यशाचे स्पष्ट द्योतक आहे. याशिवाय या उद्योगामुळे ११ स्थानिक नागरिकांना थेट रोजगार उपलब्ध झाला असून रोजगार निर्मितीच्या दृष्टीनेही हा उद्योग महत्त्वपूर्ण ठरत आहे.
आपल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना अतुल अंबादास भुतकर सांगतात की, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे माझ्यासारख्या सामान्य उद्योजकाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली. या योजनेमुळे केवळ आर्थिक सहाय्य मिळाले नाही, तर आत्मविश्वासही वाढला. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे लघुउद्योगांना चालना मिळून स्वावलंबनाची दिशा मिळत आहे.
ही यशोगाथा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीचे उत्तम उदाहरण असून, इच्छुक नवउद्योजकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
कोट:
शासनाच्या उद्योग विभागामार्फत जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या CMEGP योजनेमुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीस चालना मिळत असून युवक व युवकांनी उद्योजकतेकडे वळावे, हा योजनेचा मुख्य उद्देश साध्य होत आहे. अशा यशस्वी उद्योजकांच्या कथा इतर इच्छुक युवकांसाठी प्रेरणादायी ठरतात. अधिकाधिक युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, स्वतःचा उद्योग सुरू करून आर्थिक स्वावलंबन साधावे.
पुनम घुले, महाव्यवस्थापक ,जिल्हा उद्योग केंद्र ,वाशिम
संकलन,जिल्हा माहिती कार्यालय ,वाशिम





