Home यशोगाथा कोडेबर्राला गवसला विकासाचा मार्ग

कोडेबर्राला गवसला विकासाचा मार्ग

0

गोंदिया,दि.23ः-  कोडेबर्रा… नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा अभयारण्यालगत असलेले गाव. तिरोडा तालुक्यातील कोडेबर्रा या आदिवासी बहुल गावात १०९ कुटूंबाची वस्ती. ४१३ लोकसंख्या असलेल्या या गावात गोंड समाजाची संख्या जास्त आहे. या गावात ढिवर, लोहार आणि पोवार समाजाची २० घरे आहेत. जंगलाच्या कुशीत वसलेल्या कोडेबर्रातील सर्वच कुटूंबाकडे थोडीफार शेती देखील आहे. जवळपास गावातील सर्वच शेतकरी हे अल्पभूधारक. केवळ धान हे एकमेव पीक ते घेतात. पावसाच्या पाण्यावर अवलंबून शेती करीत असल्यामुळे उत्पन्नही कमीच. शेती ही जंगलाला लागून असल्यामुळे वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसानही इथल्या शेतकऱ्यांचे व्हायचे. व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात येणाऱ्या या गावातील कुटूंब हे स्वयंपाकासाठी जळावू लाकूड, शेतीसाठी लागणारी लाकडी अवजारे, पाळीव जनावरांना चारा व रोजगार या दैनंदिन गरजासाठी वनांवर अवलंबून असायचे. व्याघ्र प्रकल्पालगत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना सुरु झाली आणि कोडेबर्राला विकासाचा मार्गच गवसला.
या योजनेअंतर्गत कोडेबर्रात स्थापन करण्यात आलेल्या ग्राम परिस्थितीकी विकास समितीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला दिशा मिळाली. ग्राम परिस्थितीकी विकास समितीचे अध्यक्ष बंडू मरसकोल्हे व सचिव तथा वनरक्षक श्री.कापसे तसेच सातपुडा फाउंडेशनचे संरक्षण अधिकारी मुकूंद धुर्वे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन वनावरील अवलंबीत्व कमी करण्यासाठी गावातील जन-जल-जंगल-जमीन या संसाधनाचा शाश्वत विकास साधून शेतीपुरक जोडधंदे निर्मिती करणे, पर्यायी रोजगार उपलब्ध करुन देणे, मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासोबतच ग्रामस्थांच्या माध्यमातून वन आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी जाणीव करुन देण्यात आली.
वनाचे व वन्यजीवांचे महत्व कोडेबर्राच्या ग्रामस्थांना समजले. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेतून आपल्या विकासाला गती मिळेल याची खात्री त्यांना पटली. ग्राम परिस्थितीकी विकास समिती या योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आल्यामुळे या समितीच्या माध्यमातून वैयक्तीक व सामुहिक लाभाच्या योजना कोणकोणत्या द्याव्यात याबाबत नियोजन करण्यात आले. सर्वप्रथम निर्णय घेण्यात आला की, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनासाठी आता जंगलात न जाता प्रत्येक घरी गॅस कनेक्शन असले पाहिजे. स्वयंपाकासाठी जळावू लाकडे जंगलातून आणणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होय असे गावातील कुटूंबांना वाटले. स्वयंपाकासाठी लाकडे जंगलातून आणतांना वन्यप्राण्याने हल्ला केला तर जीव गमावून बसण्याची वेळ येईल. गाव बफर क्षेत्रात येत असल्यामुळे वनातून लाकडे गोळा करण्यावर सुध्दा वन्यजीव विभागाने निर्बंध आणल्यामुळे आता प्रत्येक कुटूंबाला गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय समितीने घेतला. जनवन योजनेतून कोडेबर्रातील १०९ कुटूंबापैकी १०० कुटूंबाकडे गॅस कनेक्शन देण्यात आले. उर्वरीत ९ जणांना सुध्दा लवकरच हे कनेक्शन देण्यात येणार आहे.
उघड्यावर शौचास बसण्याच्या दुष्परिणामाची जाणीव कोडेबर्राच्या ग्रामस्थांना झाली. जन-वन योजनेतून २७ कुटूंबांना शौचालये बांधून देण्यात आली. उर्वरीत कुटूंब सुध्दा लवकरच शौचालयाचे काम पूर्ण होणार आहे. गावातील २७ कुटूंबांना शेतीपुरक व्यवसाय उपलब्ध व्हावा यासाठी सन २०१४-१५ या वर्षात प्रत्येकी एक दुधाळ जर्सी गाईचे वाटप करण्यात आले. दररोज २५० ते ३०० लिटर दुधाचे संकलन होते. हे कुटूंब दिनशा व खाजगी दूध डेअरीला २३ रुपये प्रती लिटर याप्रमाणे दुधाची विक्री करीत आहे. त्यामुळे या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. रोजगारानिमीत्त या कुटूंबांचे वनावरील अवलंबित्व दुधाळ जनावरांमुळे कमी झाले आहे. गावातील १०० कुटूंबांना गॅस ओटे बांधून देण्यात आले आहे. जंगलालगतच्या कोडेबर्रात पाऊस व वादळामुळे कधी कधी वीज पुरवठा खंडीत होतो तर कधी वीज भारनियमन होते. अशावेळी घरी शिक्षण घेणाऱ्या मुलांना रात्रीच्या वेळी अभ्यास करतांना अडचण जावू नये म्हणून १०० कुटूंबांना सौर कंदील वाटप केले आहे. १५ शेतकऱ्यांच्या शेतीला सौर कुंपन मंजूर झाले आहे. त्यामुळे जंगलालगत असलेल्या शेतीतील पिकाची वन्यप्राण्यामुळे नुकसान होणार नाही. शेतातील पीक सौर कुंपनामुळे सुरक्षीत राहण्यास मदत होणार आहे. १०९ कुटूंबांना स्वयंपाकासाठी निर्धुर चुलीचे वाटप करण्यात आल्यामुळे महिलांची स्वयंपाक करतांना धुरामुळे डोळ्यांना होणारा त्रास बंद झाला आहे. जंगलालगतच कोडेबर्रातील शेतकऱ्यांची शेती आहे. जंगलातून येणारे वन्यप्राणी त्यांचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू होवू नये यासाठी १३ शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीला सुरक्षीत कठडे लावण्यात आले आहे.
गावाच्या जवळच्या असलेल्या छोट्या तलाव खोलीकरणाचे काम व माती बंधाऱ्याचे काम करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जंगलातून येणारे पावसाचे पाणी तलावात अडवून सिंचनासाठी तर या पाण्याचा वापर होईलच सोबतच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे समितीचे अध्यक्ष बंडू मरसकोल्हे यांनी सांगितले. गावातील महिलांचे ६ बचतगट असून बचतगटातील महिला हया आर्थिक अडचणीच्या वेळी बचतगटातील पैसा उपयोगात आणतात तसेच अर्थोत्पादनात पतीला देखील हया महिला सहकार्य करीत आहे. माविमच्या सहयोगीनीच्या मार्गदर्शनामुळे त्या आता आत्मनिर्भर होत आहे.
शारदाबाई मडावी म्हणाली की, पूर्वी आम्ही स्वयंपाकासाठी लागणारे लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात जात होतो. परंतू आता जनवन योजनेतून गॅस कनेक्शन देण्यात आल्यामुळे आम्ही इंधनासाठी होणारी भटकंती तर थांबलीच सोबत धुरमुक्त स्वयंपाक आम्ही करीत आहो. स्वयंपाक पण लवकरच होतो. कुटूंबातील चारही व्यक्ती आता गॅस उपलब्ध झाल्यामुळे आनंदी आहोत.
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेतून गावातील कुटूंबाच्या तसेच सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे. या योजनेमुळे वनावरील अवलंबीत्व कमी होवून पर्यायी रोजगार सुध्दा उपलब्ध होत आहे. या योजनेमुळे मानव-वन्यजीव यांचे सहसंबंध वाढीला लागत आहे.

Exit mobile version