
नागपूर,दि.26ः-कोविड -१९ मुळे या वर्षी सर्वच जनसहभाग असलेले कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता दीक्षाभूमीवर दरवर्षी होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळाही रद्द करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने घेतला आहे. आजवरच्या इतिहासातच प्रथमच हा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे.
धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्यानिमित्त दीक्षाभूमीवर मोठय़ा प्रमाणात जनसागर दरवर्षी लोटत असतो. पण यावर्षी कोरोनामुळे येणार्या जनसागराकडून कोरोना संबंधी शिस्त आणि नियमांचे पालन करून घेणे कठीण होणार आहे. तसेच गर्दीत कोणी कोरोनाबाधित असल्यास इतरांना संक्रमणाचा धोका होऊ शकतो. यामुळे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यंदा कोणताही कार्यक्रम आयोजित होणार नसल्यामुळे दुकानांनाही परवानगी देण्यात येणार नाही. धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात फक्त स्मारक समितीचे पदाधिकारीच शासनाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणार्या निर्देशाचे पालन करीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देणार आहेत. जनतेने आपल्या घरी राहूनच १४ ऑक्टोबर आणि विजयादशमीला बौध्दवंदना आणि बाबासाहेबांना अभिवादन करून धम्मचक्र प्रवर्तनदिन साजरा करावा, असे आवाहन स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी केले आहे.





