पोलिस पाटीलांच्या विमा संरक्षणाची मुदत जून २०२१ पर्यंत

0
16

कोसमतोंडीदि.18:-कोविड-१९ कोरोना संक्रमण काळात कर्तव्य बजावत असताना कोविड आजाराने मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांना विमा संरक्षण कवचची मुदत पोलिस पाटील संघटनेच्या सतत पाठपुरावा नंतर अखेर जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आली. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे वित्त विभाग, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील,खासदार प्रफुल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांचे महाराष्ट्र गाव कामगार पोलिस पाटील संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोग्य सेवा कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त पोलिस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी,मानसेवी पोलिस पाटीलसह सर्वेक्षण,शोध,माग काढणे, प्रतिबंध,चाचणी, उपचार व मदतकार्यात गुतंलेल्या कर्मचा-यांना मृत्यूच्या प्रकरणी ५० लाख रुपये रकमेचे विमा संरक्षणाची मुदत डिसेंबर २०२० पर्यंत करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर राज्यात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट येऊन रूग्ण संख्येत दुपटीने वाढ होऊन सुद्धा विमा संरक्षणाची मुदत वाढविण्यात आली नव्हती. यादरम्यान, सन २०२० ला २० पोलिस पाटील व सन २०२१ ला आजपर्यंत १७ पोलिस पाटीलांचा मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्र गाव कामगार पोलिस पाटील संघटनेच्या वतीने सतत गृहमंत्रालय,खासदरा प्रफुल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांना वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याला त्यांनी नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.अखेर १४ मे २०२१ च्या शासन परिपत्रकानुसार विमा संरक्षणाची मुदत जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आली.
दरम्यान, कोरोना संक्रमित झालेल्या पोलिस पाटीलांसह सर्व फ्रंट लाईन कर्मचा-यांच्या झालेल्या वैयक्तिक खर्च शासनानी देण्याची तरतूद करावी, आणि विमा संरक्षणाची मुदत डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी पोलिस पाटील संघटनेने केली आहे.शासनाने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, दिलीप मेश्राम गोंदिया,शरद ब्राम्हणवाडे गडचिरोली, सुधाकर साठवने भंडारा,विजय घाटगे नागपूर, राजेश बन्सोड,श्रीराम झिंगरे, नंदाताई ठाकरे, रमेश टेंभरे यांनी केले आहे.