महिला अधिकाऱ्याची सुसाइड ऑडिओ नोट चर्चेत; म्हणाल्या लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते झुंडीने धावून येतात

0
82

अहमदनगर–“लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले”, असं हृदयाला बोचणारे शल्य व्यक्त करीत नगर जिल्ह्यातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने चक्क अकरा मिनिटांच्या ऑडिओ क्लिपद्वारेच आपली सुसाईड नोट जाहीर केली आहे.

आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांचा संदर्भ देत आपल्याही मनात असाच विचार येत असल्याचे त्यात म्हटले आहे. नगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील या वरिष्ठ महिला अधिकारी असल्याचे समजते. त्यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींवर आरोप करताना काही घटनांची उदाहरणेही दिली आहेत. या क्लीपमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

वन अधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून त्यांनी ही ऑडिओ क्लीप केली आहे. महिला अधिकारी म्हणून होणारा त्रास, वरिष्ठांकडून केले जाणारे दुर्लक्ष, नोकरीत येताना केलेला निर्धार आणि प्रत्यक्षात झालेली निराशा अशा विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. मध्येच त्या हमसून हमसून रडतानाही ऐकू येतात. हीच आपली सुसाईट नोट समजावी, असेही त्या म्हणत आहेत. तर कधी धीराने लढण्याची शिकवण असल्याचे सांगत आहे.

“दिपाली.. तुझ्या पाठी यावे असं वाटतंय”
त्यांनी म्हटले आहे, ‘दीपाली तू हे कृत्य केल्याचे मला तेव्हा आवडले नव्हते. पण आता एकूण त्रास लक्षात घेता तुझ्याच पाठी यावे, असे वाटत आहे. महिला अधिकारी म्हणून लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एका रथाची दोन चाके आहेत. मात्र, आपल्या चाकाने गती घेतली की घात झालाच समजा. कारण महिलांनी मागे राहणे हेच मनूने शिकविले. हे सगळे मनूचे अनुयायी आहेत. मग एकटीने वाट कशी चालायची? दीडशहाणी, आगाऊ अशी विशेषणे लावली जाणार. जो पर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आपल्याविरूद्ध उपोषण, मोर्चे, आंदोलने घडवून आणणार, असं या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.

स्त्री जातीचा उजेड त्यांना सहन होत नाही. आंदोलनांवर नाही भागले तर तर विधानसभेत प्रश्न मांडायचा, जुन्या चुका उकरून काढून त्याचे भांडवल करायचे. मग चौकशांच्या जात्यातून जावे लागते. एवढे सहन करण्याची ताकद महिलांमध्ये कुठे आहे? मोठी जबाबदारी संभाळताना एखादी चूक होऊ शकते, मात्र महिलेला माफी नाही कारण अहिलेलासुद्धा माफी नव्हती. दीपाली, तुझ्या मार्गावर निघण्यापूर्वी मी घाई करतेय असे वाटत आहे. पण मी जरा कायद्याच्या वाटेने जाऊन पाहिले. खंडणी मागणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हा मला वाटले आता माझ्या धाडसाचे कौतूक होईल. मला म्हणतील, “ओ शेट.. तुम्ही नादच केला थेट” अशा थाटात सर्व अधिकारी वर्ग माझे जंगी स्वागत करतील. पण छे, असे काही झालं नाही. शेठ हे फक्त पुरूषाला म्हणतात. बायांना कुठे शेठ म्हणता येते?, असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

लहानपणी मला धीर देणारे माझे आजोबा होते. पुराणातील दाखले देत मला म्हणायचे, ‘हे पहा पोथ्या वाचून तुझे नांव ज्योती ठेवले आहे. अंधारात डगमगायचे नाही.” त्यातून मला जिद्ध मिळाली. आता असे कोणी उरले नाही. आता एकदाची निघून जावे वाटते सुसाईट नोटमध्ये यांची सर्वांची नावे लिहून ठेवावीत. पण पुन्हा वाटते की अरे ती सुसाईट नोट कोर्टाने खोटी ठरविली तर? मग हिरा बनसोडे सारखे फिर्याद कोणाकडे द्यायची?

कधी वाटते बंदुक घेऊन सुसाट पळावे यांच्या मागे. पण नंतर वाटते पोथ्यांत सांगितले आहे तसे यांना माफ करावे. माझ्यासारखी एक महिला अधिकारी विझली तर राज्यातील सर्व पुरूष अधिकारी आणि लोकप्रतिनिधी महिला अधिकाऱ्यांना घाबरून वागतील. किंवा इतर अधिकारी ज्योतीसारखे फार धाडसाने वागू नये म्हणतील. साईड पोस्ट मागतील किंवा नोकरीच सोडतील, असे हुंदके देत त्यांनी म्हटले आहे.

मन परिवर्तन झाले..?
ही सुसाईड नोट व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत संबंधित महिला अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे समजते त्यातून त्यांचे मनपरिवर्तन झाल्याची ही माहिती आहे काही अघटीत होऊ नये यासाठी आता अधिकारी स्तरावर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.