बाघनदीच्या पात्रात कालीमाटीची चार मुले बुडाले

0
529

गोंदिया,दि.07ः आमगाव तालुक्यातील कालीमाटी येथील वाघ नदीपात्रात चार युवक वाहून गेल्याची घटना आज मंगळवार, 7 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. संतोष अशोक बहेकार (19), रोहित नंदकिशोर बहेकार (18) मयूर अशोक खोब्रागडे (21), सुमित दिलीप शेंडे (16) सर्व रा. कालीमाटी ता. आमगाव अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. वृत्त लिहीपर्यंत खलाशी व आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोधकार्य सुरू होते.
आज सकाळच्या सुमारास संतोष बहेकार, रोहित बहेकार, मयुर खोब्रागडे, सुमित शेंडे, कार्तिक दोनोडे, विशाल मेंढे व रोहित फुंडे हे सात मित्र मार्बत विसर्जनाकरिता वाघ नदीच्या मुंडीपार येथील घुबडघाट काठावर गेले होते. दरम्यान सातही मित्रांनी नदीपात्रात आंघोळीचा बेत आखला. परंतु हा बेत चार मित्रांच्या जीवावर ओढावला. पाण्याचा अंदाज चुकल्याने संतोष, रोहित, मयूर, सुमित हे खोल पाण्यात बुडाले. इतर तिन्ही मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी ठरले. घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच आमगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत बचाव व शोधकार्य सुरू केला आहे. वृत्त लिहीपर्यंत शोधकार्य सुरू होते.