नक्षलवाद्यांनी केली दोन वनरक्षकांना बेदम मारहाण

0
210

गडचिरोली,दि.12 जानेवारी– नक्षलवाद्यांनी नारगुंडा पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या विसामुंडी गावाजवळ भामरागड वनविभागातील दोन वनरक्षकांना गावालगतच्या जंगल परिसरात नेऊन बेदम मारहाण केल्याची घटना 12 जानेवारी रोजी आज समोर आली आहे. हुकेश रामकृष्ण राऊत (२९) वनरक्षक विसामुंडी व जागेश्वर माधव चुरगाये (३०) वनरक्षक नारगुंडा अशी जखमींची नावे आहेत. ते दोघेही सकाळी आलेंगा उपक्षेत्रातील नियतक्षेत्र विसामुंडी येथे वनतलावाच्या जागेची पाहणी करण्याकरता ११ जानेवारी रोजी गेले होते.
यानंतर, गावकऱ्यांसोबत चर्चा करून दुचाकीने परतताना विसामुंडी नाल्याजवळ नक्षल्यांनी त्यांना अडवले. व तुम्ही कोण, या रस्त्याने कसे आले? असे विविध प्रश्न विचारत जंगलात नेऊन झाडाला बांधले व इथून पळण्याचा प्रयत्न केला तर ठार मारू अशी हुलकावणी देऊन बेदम मारहाण केली. नक्षलवाद्यांनी त्यांच्या जवळील मोटार सायकल – १, मोबाईल – २, जीपीएस-२, हॅमर-१ आणि पीओआर बुक इ. साहित्यही हिसकावून घेतले असे वनरक्षकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.