
गोंदिया,दि.13ः-जिल्ह्यातील नागझिरा-नवेगाव व्याघ्रप्रकल्पातंर्गत येत असलेल्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध अभयारण्य परिसरातील प्रतापगड पहाडीला लागून असलेल्या रामघाट बीटातील कक्ष क्रमांक २५४ बी एका वाघाची शिकार करण्यात आली. ही घटना आज गुरुवार, 13 जानेवारीला उघडकीस आली. सदर वाघ हा 3-4 वर्षाचा असावा असा अंदाज आहे. तसेच विद्युत शाॅक लावून वाघाची शिकार करण्यात आल्याचा अंदाज बांधला जात आहे. सदर वाघ हा नवेगावबांध-नागझिरा अभयारण्यातील नसून बाहेरुन या परिसरात आल्याचे बोलले जात आहे.
अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत रामघाट बीट कक्ष क्रमांक २५४ बी मध्ये वन कर्मचारी व वन मजूर गुरुवारी सकाळी गस्त घालण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांना बीट क्रमांक २५४ बी मध्ये एक वाघ मृतावस्थेत आढळला. त्यांनी याची माहिती लगेच उपवनसंरक्षक व संबंधित अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच उपवनसंरक्षक कुलराज सिंग यांच्यासह वन विभागाचे अधिकारी आणि मानद वन्यजीव संरक्षक मुकुंद धुर्वे, सावन बहेकार हे घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळावरील मृतावस्थेत आढळलेल्या वाघाचा जबडा व नखे गायब आहे. तसेच या वाघाची दोन दिवसांपूर्वीच शिकार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विद्युत शाॅक लावून या वाघाची शिकार करण्यात आली असावी अंदाज घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी वर्तवला असून, पंचनामा करण्यात आला आहे. वाघाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होवू शकेल, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिकार्यांची टोळी सक्रिय?
जिल्ह्यात मागील चारपाच महिन्यांच्या कालावधीत विद्युत शॉक लावून वन्यप्राण्यांची शिकार केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. त्यातच रामघाट परिसरात आढळलेल्या वाघाची शिकार सुद्धा विद्युत शॉक देवून करण्यात आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तसेच वाघाचे अवयव गायब असल्याने त्याची यासाठीच शिकार केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिकार्यांची टोळी सक्रिय असल्याची दाट शक्यता आहे.