पर्ल्सच्या अध्यक्षासह चार संचालक गजाआड

0
10

मुंबई – देशभरातील प्रमुख गैरव्यवहारांपैकी पर्ल्सचा 49 हजार कोटींचा गैरव्यवहार गाजत आहे. या गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक निर्मलसिंग भांगू याच्यासह चार संचालकांना आज अटक केली. 

पर्ल्स कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, व्यवस्थापकीय संचालक सुखदेव सिंग, कार्यकारी संचालक (अर्थ) गुरमित सिंग आणि सुब्रता भट्टाचार्य या चौघांना सीबीआयने दिल्लीत अटक केल्याची माहिती सीबीआयचे प्रसिद्धीप्रमुख आर. के. गौर यांनी दिली. चौकशीदरम्यान त्यांनी विसंगत उत्तरे दिली आणि सीबीआयला सहकार्य केले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विरोधात फसवणूक, कट कारस्थान रचण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पर्ल्स कंपनीत देशभरातून 6 कोटी गुंतवणूकदारांनी 49 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गुंतवणूकदारांचा परतावा रखडल्याने कंपनीविरोधात सेबीने कारवाईचा बडगा उगारला होता. कंपनीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश काढले. मात्र, गुंतवणूकदारांच्या रकमा 45 दिवसांत परत करण्याच्या सेबीच्या आदेशालाही कंपनीने केराची टोपली दाखवली.

परतावा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी महाराष्ट्र, राजस्थानसह इतर राज्यामध्ये कंपनीविरोधात आंदोलनेही केली.