
मुंबई: राज्यात सध्या केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा जोरात सुरु आहे. ईडी, सीबीआय, आयटीच्या धाडी सातत्याने सुरु असतानाच आता शेतकरीही त्यांच्या रडारवर असणार आहे. आता शेतकऱ्यांवरही आयकर विभागाची नजर असणार आहे. अतिश्रीमंत शेतकरी आता आयकर विभागाच्या रडारवर आहेत. अशा शेतकऱ्यांची माहिती जमा केली जाणार आहे. त्यांच्या ‘करमुक्त’ दाव्यांची छाननी होणार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अतिश्रीमंत शेतकरी आता आयकर विभागाच्या रडारवर असणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दहा लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शेतकऱ्यांची माहिती आयकर विभागाकडून घेतली जाणार आहे. १९६१ च्या आयकर कायद्यातील कलम १० (१) नुसार शेतीचं जे उत्पन्न आहे, ते करमुक्त करण्यात आलं आहे. तेंव्हाची गरज पाहता ते करमुक्त करण्यात आलं आहे. मात्र, यातून गैरफायदा घेण्यात आल्याचे प्रकार आढळून येत आहेत. तेलंगणातील एका शेतकऱ्याने एक कोटी नऊ लाखाचे उत्पन्न घेतल्याचं दाखवलं आहे. वित्त विभागाचा संशय आहे की, शेतीचं उत्पन्न दाखवून करातून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. त्यामुळेच वित्त विभागाच्या लेखा समितीनं असं ठरवलं आहे की, ज्यांचं उत्पन्न दहा लाखांहून अधिक दाखवलेलं आहे, त्यांच्या उत्पन्नांची आयकर विभागाकडून छाननी केली जाईल. त्याच्यातून हे जाणून घेतलं जाईल की खरंच हे शेतीचं उत्पन्न आहे का? या उद्देशाने आता ही तपासणी केली जाणार आहे.