मुख्यमंत्र्यांच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन, हायकोर्टाने राणा दाम्पत्याला झापलं!

0
115

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याला मोठा झटका दिलाय. राणा दाम्पत्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिका फेटाळताना न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात किंवा निवासस्थानाबाहेर म्हणजेच रस्त्यावर हनुमान चालिसा म्हणू, अशी राणा दाम्पत्याची घोषणाच अन्य व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारे आहे, असं मोठं आणि महत्त्वाचं मत न्यायालयाने नोंदवत राणा दाम्पत्याला जोरदार चपराक दिली.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानात किंवा निवासस्थानाबाहेर म्हणजेच रस्त्यावर हनुमान चालिसा म्हणू, अशी राणा दाम्पत्याची घोषणाच अन्य व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारे आहे”, असं महत्त्वाचं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलं.”आम्ही काही दिवसांपूर्वी एका प्रकरणात म्हटले होते की, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी परस्परांशी योग्य वर्तन ठेवायला हवे… विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विचारांचाही आदर करायला हवा… मात्र, आम्हाला दुर्दैवाने अत्यंत खेदाने नमूद करायला हवे की, आम्ही ज्या काही समजुतीच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या निव्वळ बहिऱ्या कानांवर पडल्यात”, अशा शब्दात हायकोर्टाने सत्ताधारी आणि विरोधकांना सुनावलं.

नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाच एफआयआर रद्द करण्याच्या विनंती रिट याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. राणा दाम्पत्याच्या वागण्याने समाजात अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती, या पोलिसांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचंही न्यायालयाने म्हटलं.

जरा जबाबदारीने वागा…!

“याचिकादार (राणा दाम्पत्य) हे लोकप्रतिनिधी असल्याने सामाजिक व राजकीय जीवनात दावा करतात. मग त्यांनी अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. मोठी सत्ता ही मोठ्या जबाबदारीसोबतच येते, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी जबाबदारीने वागायला हवे, ही किमान अपेक्षा आहे…”, अशी महत्त्वाची कमेंट करत न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने राणा दाम्पत्याला जोरदार चपराक लगावली.