डॉ. आगलावे यांचा नेमका दावा काय?
डॉ. आगलावे यांनी भारतातील प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बौद्ध विहार आणि स्तुप असल्याचा दावा केला आहे. “संशोधकांनी भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरे ही पूर्वीची बौद्ध विहारे होती हे सिद्ध केले आहे. प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ (१९२९) या पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ‘ठिकठिकाणच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वास्तूंचा आणि बौद्धमूर्तींचा उच्छेद केला गेला आणि तेथे शंकराच्या पिंडी तयार करण्यात आल्या”, असे आगलावे म्हणाले आहेत. “कित्येक ठिकाणी तर अशा रीतीने बौद्ध विहारांचे रुपांतर शंकरांच्या देवळांत झाले. लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पाहा. ही वास्तविक बौद्धांची. तेथे एक देवी प्रगट झाली. तिचे नाव एकविरा. ही म्हणे पांडवांची बहिण”, असे डॉ. आगलावे यांनी लोकसत्ताला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
“हजारोंच्या संख्येनं पंढरपूरला जाणार”
दरम्यान, यासंदर्भात बोलताना भीम आर्मीने मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर हे बौद्ध विहार असल्याचं घोषित करावं, अशी मागणी केली आहे. “डॉ. आगलावे यांनी जी भूमिका मांडली तिला आमचं समर्थन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या रिडल्स इन हिंदुइजम या पुस्तकात लिहिलं आहे की तिरुपती बालाजी इथली मूर्ती तथागत गौतम बुद्धांची आहे आणि ते विहार आहे. पंढरपूरच्या मंदिरात गौतम बुद्धाची मूर्ती असून तेही विहार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. आपण पंढरपूरचं मंदिर विहार आहे असं घोषित करावं. तिथे हजारोंच्या संख्येनं आम्ही बुद्धवंदना घ्यायला जाणार आहोत”, असं अशोक कांबळे म्हणाले आहेत. “आम्ही कुणाच्या धर्माच्या विरोधात नाही. आम्ही द्वेषाचं राजकारण करत नाही”, असं देखील अशोक कांबळे म्हणाले आहेत.