सलग 3 दिवस बंद राहणार बँका:सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी विविध मागण्यांसाठी 27 जूनला जाणार संपावर

0
27

नवी दिल्ली,दि.09ः- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी या महिन्यात 27 जून रोजी संपावर जाऊ शकतात. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या 9 बँक युनियनच्या संघटनेने म्हटले आहे की, जर सरकारने त्यांची मागणी मान्य केली नाही तर बँक कर्मचारी एक दिवस काम बंद ठेवतील.

सलग 3 दिवस बँका बंद राहणार

कर्मचारी संपावर गेल्यास सलग तीन दिवस बँका बंद राहतील, 25 तारखेला महिन्याचा चौथा शनिवार आणि 26 तारखेला रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. अशा परिस्थितीत अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

संप का होत आहे?

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन अनेक दिवसांपासून बँकांमध्ये 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी करत आहे. बँकांनी आठवड्यातून फक्त पाच दिवस काम करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. हा नियम खासगी क्षेत्रातील बहुतेक मोठ्या कंपन्यांना लागू आहे.

यूएफबीयूने आता म्हटले आहे की, जर सरकारने त्यांच्या पाच दिवसांचे काम आणि पेन्शनच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी 27 जून रोजी संपावर जातील. एआयबीओसीचे सरचिटणीस सौम्या दत्ता यांनी सांगितले की, सरकारने बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर देशभरातील सुमारे 7 लाख बँक कर्मचारी संपावर जातील.