नवी दिल्ली(वृत्तसंस्था) महाराष्ट्रासह 4 राज्यांतील राज्यसभेच्या 16 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरूवात झाली. त्यात राजस्थानात काँग्रेसचा 3 जागांवर विजय झाला आहे. तर भाजपला 1 जागा मिळाली आहे. येथे एकूण 4 जागांसाठी निवडणूक झाली होती. अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांचा पराभव झाला. कर्नाटकच्या 4 पैकी 2 जागांचे निकाल स्पष्ट झालेत. त्यात भाजपच्या निर्मला सीतारमण व काँग्रेसच्या जयराम रमेश यांचा विजय झाला आहे.
राज्यसभेची निवडणूक एकूण 57 जागांसाठी होणार होती. पण, 41 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे उर्वरित 16 जागांसाठी ही निवडणूक झाली. त्यात चारही राज्यांत मोठ्या राजकीय घडामोडी दिसून आल्या.
कर्नाटकात संयुक्त जनता दलाचे (जेडीएस) आमदार के. श्रीनिवास गौडा यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केले. त्यांनी काँग्रेस आपला आवडता पक्ष असल्याचे स्पष्ट केले. हरियाणात काँग्रेसची 2 मते बाद झाली.
राजस्थान: कांग्रेस-3, भाजपा-1
राजस्थानात काँग्रेसच्या मुकूल वासनिक, रणदिप सिंह सुरजेवाला व प्रमोद तिवारी या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. सुरजेवालांना 43, वासनिक यांना 42 तर तिवारी यांना 41 मते पडली. राज्यातील भाजप आमदार शोभाराणी यांनी काँग्रेस उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान केले. सूत्रांच्या माहितीनुसार, शोभाराणी यांच्यासह भाजप आमदार कैलाश चंद्र मीणा यांनीही मतदान करताना चूक केली आहे. त्यामुळे त्यांचेही मत बाद होऊ शकते. यासंबंधीचा निर्णय सीसीटीव्ही फुजेट पाहून घेतला जाईल. भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी याची कल्पना हायकमांडला दिल्याचे सांगितले.
तत्पूर्वी, आमदारांच्या घोडेबाजाराची भीती पाहता प्रशासनाने आमेर क्षेत्रातील इंटरनेट सुविधा 12 तासांसाठी बंद केली होती. आणखी एक प्रकरण होते बसपच्या काँग्रेसमध्ये आलेल्या 6 आमदारांच्या मतदानाचे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी निकाल थांबवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.
कोणाला किती मते मिळाली?
रणदीप सुरजेवाला यांना 43 मते मिळाली.
मुकुल वासनिक यांना 42 मते मिळाली.
घनश्याम तिवारी यांना 43 मते मिळाली.
प्रमोद तिवारी यांना 41 मते मिळाली.
डॉ.सुभाष चंद्र यांना 30 मते मिळाली.
कर्नाटक: राज्यसभा जागा – 4
कर्नाटकात भाजपच्या निर्मला सीतारामन आणि काँग्रेसचे जयराम रमेश राज्यसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत.
जेडीएस नेते व माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी भाजपवर काँग्रेसची मदत घेतल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले -सी. टी. रवी भाजप सरचिटणीस आहेत. ते काँग्रेसच्या कार्यालयात कशाला गेले? त्यांनी भाजपच्या उमेदवारासाठी काँग्रेसच्या सिद्धरमैय्या यांच्याकडे सहकार्य करण्याची विनंती केली.
जेडीएसने सांगितले की, त्यांच्या 2 आमदारांनी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले. नाही. एक आमदार के. श्रीनिवास गौडा यांनी स्वतःच आपण क्रॉस व्होटिंग केल्याचे स्पष्ट केले. तर एस. आर. श्रीनिवास यांनीही आपले मत रिक्त सोडले.
महाराष्ट्र : राज्यसभा जागा – 6
तुरुंगात बंदिस्त असणाऱ्या नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही. कोर्टाने राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी याचिकेत दुरुस्ती करण्याचे निर्देश दिलेत. मलिक यांनी विधानभवनात जाण्यासाठी पोलिसांकडून एस्कॉर्टची मागणी केली होती. महाराष्ट्रात भाजपचा पराभव करण्यासाठी ओवैसींच्या एमआयएमने काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, याचा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी, राज ठाकरेंच्या मनसेने शिवसेनेवर कडाडून हल्लाबोल केला. शिवसेनेने ओवैसींचा पाठिंबा घेतला. यावरुन त्यांचे बोगस हिंदुत्व चव्हाट्यावर आले. ते निझामाच्या वंशजांचा पाठिंबा घेण्यासही मागेपुढे पाहत नाहीत, असे मनसेने म्हटले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे.
हरियाणा: 2 जागा
येथे काँग्रेसच्या 2 उमेदवारांचे मतदान रद्दबातचल झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोघांनी आपली मतपत्रिका एजंटांसह जजपा पार्टीचे एजंट दिग्विजय चौटाला यांना दाखविले. आमदार बलराज कुंडू यांनी राज्याच्य हितासाठी कुणालाही मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र व हरियाणातील राज्यसभा निवडणुकीविषयी भाजपच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले की, आमच्या पक्षाने या दोन्ही राज्यांतील निवडणूक प्रक्रियेविषयी तक्रार दाखल केली आहे. भाजपने महाराष्ट्रात 3 व हरियाणात 2 काँग्रेस आमदारांनी गोपणीयतेचा भंग केल्याचा आरोप केला आहे.