राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का:अनिल देशमुख – नवाब मलिकांना विधान परिषदेसाठी मतदानाचा हक्क नाकारला

0
36

राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता न आलेले आणि सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकी आधीच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. कोणत्याही कैदेत असणाऱ्या व्यक्तिला सर्वसामान्य माणसांप्रमाणे हक्क राहत नाही, यामुळे मलिक आणि देशमुखांना मतदान करता येणार नसल्याचे ईडीकडून न्यायालयात सांगण्यात आले होते.

राज्यसभेच्या पराभवानंतर प्रत्येक पक्ष आप आपल्या परीने विधान परिषद निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, भाजपचे 4 उमेदवार निवडून येतील इतके संख्याबळ त्यांच्याकडे आहे. तर शिवसेनेकडे 2 उमेदवार निवडून येतील ऐवढे संख्याबळ आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संख्याबळ नसताना प्रत्येकी 2 उमेदवार उभे केले आहेत. यातच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मतदानापासून वंचित रहावे लागले होते. आणि आताही विधान सभेसाठी त्यांना मतदान करण्याची परवानगी उच्च न्यायालयाकडून देण्यात आली नाही.

विधानसभा आखाडा : 285 आमदार

मतांचा कोटा : 27

शिवसेना 55 मते+ 2 उमेदवार = 1 मत अतिरिक्त

राष्ट्रवादी 51 मते+ 2 उमेदवार = 3 मतांची गरज

काँग्रेस 44 मते +2 उमेदवार = 10 मतांची गरज

भाजप 106 मते + 5 उमेदवार = 29 मतांची गरज

आघाडीचे नाक कापले ः सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या यावर म्हणाले की, कोर्ट हे माफिया, सरकार सांगेल तसे चालणार नाही. ज्या व्यक्तीला कोर्टाने सांगितले आहे की, मलिक हे दाऊदचा हस्तक आहे. त्यांना मंत्रिमंडळात ठेवले. त्यांना मतदान करण्यासाठी निवडणूक आयोग सूट देणारच नाही. आम्ही न्यायालयाच्या निर्णयांचे स्वागत करतो. या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे नाक कापले गेले आहे.

भाजप विजयी होणार : शेलार

आशिष शेलार म्हणाले, मविआच्या सर्व उमेदवारांना फटका बसला आहे. मविआसाठी अपशकुनाची सुरुवात झाली आहे. आता भाजप सर्व 5 जागा जिंकणार आहे. राज्यसभेच्या वेळी काँग्रेसने शिवसेनेचा विश्वासघात केला. भाजपकडून शिवसेनेला अशी वागणूक कधी दिली गेली नाही, असे टोलेही त्यांनी हाणले.