महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. आता अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे.
राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिलं. तर चेतन तुपे यांनी साळवी यांचा प्रस्ताव मांडला, तर संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिलं. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावे लागणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षांची निवड झाली आहे. शिंदे सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं तर महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणाला राजन साळवी यांना मैदानात उतरवलं होतं. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होतील हे जवळपास निश्चित होतं.
विधानमंडळावर सासरे आणि जावयांचं ‘राज्य’
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानं विधानमंडळावर सासरे आणि जावयांचं ‘राज्य’ असणार आहे. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती म्हणून जावई आणि सासरे अशी जोडी पाहायला मिळाली आहे.
Live Update
- शिंदे गटाने शिवसेनेचा व्हीप पाळला नाही. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केले आहे.
- राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. अध्यक्षपदासाठी त्यांना 164 आमदारांनी मतदान केले.
- बविआ आणि मनसेच्या आमदारांचेही राहुल नार्वेकरांना मतदान.
- आता मविआचे उमेदवार राजन साळवी यांच्यासाठी मतदान सुरु आहे.
- समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी व रईस शेख तटस्थ राहिले. एमआयएमचे आमदारही तटस्थ राहिले. त्यांनी मविआ उमेदवाराला मत दिले नाही.
- मतदानासाठी आदित्य ठाकरे यांनी पूर्ण नाव सांगताना आईचेही नाव उच्चारले.
- विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला ठीक 11 वाजता ‘वंदे मातरम’ गीताने सुरुवात झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित आमदारांची सभागृहाला ओळख करुन दिली.
- शिवसेनेचे आमदार सभागृहात बंडखोर शिवसेना आमदारांशी भिडतील, अशी शक्यता होती. पण आतापर्यंत सभागृहात असे काहीही घडलेले नाही. सभागृहाचे कामकाज शांततेत सुरू आहे.
- चंद्रकांत पाटील यांनी भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव मांडला, तर मविआकडून उमेदवार राजन साळवी यांचा प्रस्ताव मांडला.त्यां