कोकणात मुसळधार, रत्नागिरीत पूरस्थिती; कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ

0
10

राज्यात कोकणासह अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबईसह रत्नागिरी आणि कोल्हापूरला पावसाचा तडाखा बसला आहे. कोकणात मुसळधार पाऊस असल्याने रत्नागिरीत पूरस्थिती असून कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झालीय. प्रशासन या स्थितीवर उपाय करीत आहे तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला उपाययोजनांच्या सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.

राजाराम बंधारा पाण्याखाली

कोल्हापुरात सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. सकाळपर्यंत राधानगरी धरणातील पाणीसाठा वाढत आहे. भोगावती आणि कासारी नदी दुथडी भरून वाहत आहे. बर्की बंधारा पाण्याखाली गेला असून येथील धबधबा पाहण्यासाठी आलेले पर्यटक गावातच अडकले आहेत. पाणी कमी होईपर्यंत पर्यटकांना वाट पहावी लागणार आहे.

गोवा महामार्गावर दरड कोसळली

गोवा महामार्गावरील परशुराम घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. चौपदीकरणासाठी घाटाचे काम सुरु आहे. मात्र दरड कोसळल्याने घाटातील बांधकामावरही मोठा परिणाम झाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

वाढता पाऊस आणि पुराची शक्यता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली असून सबंधित पालक सचिवांना त्या- त्या जिल्ह्यांमध्ये पोहचून प्रत्यक्ष देखरेख व नियंत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत.

रायगड जिल्ह्यात पूरस्थिती

रायगड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता रायगड जिल्हाधिकार्‍यांची चर्चा करून संपूर्ण स्थितीची माहिती घेतली आणि योग्य ते दिशानिर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पंचगंगेच्या पातळीत वाढ

गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पात्रात झपाट्याने वाढ झाली आहे. काल सायंकाळी पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पातळी 16 फुटांवर होती. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीची पातळी 24 फुटांपर्यंत पातळी आहे. एका रात्रीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 8 फुटांची वाढ झाली आहे.

नागरिकांचे स्थलांतर करा

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान कोल्हापुरात नागरिकांना पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी.पूरग्रस्त भागातून नागरिकांचे स्थलांतर करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

80 पर्यटक सुखरूप

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा पाहण्यासाठी सोमवारी दुपारी 2 वाजता कोल्हापूर येथून 2 मिनीबस व 8 कारमधून अंदाजे 80 पर्यटक गेले होते. परतीच्या प्रवासावेळी सायंकाळी 5 वाजता बर्की गावाजवळील ताफेरा ओढा तसेच कासारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने सर्व प्रवासी अडकले होते. दोन्ही ठिकाणची पाणी पातळी ओसरल्यावर सर्व वाहने व प्रवासी सुखरूप बाहेर पडले आहेत. या प्रवाशांना धीर देण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी बर्की ग्रामस्थ, तरुण मंडळाचे अध्यक्ष, गावकरी, रेशन दुकानदार व वनरक्षक त्यांच्या सोबत होते.

पाऊसाचे अपडेट्स

  • पंचगंगा नदीवरील जवळपास 15 बंधारे पाण्याखाली गेले.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्याला काल सकाळपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले.
  • वैभववाडीत सर्वाधिक पावसाची नोंद झाली. ​​​​​
  • मुसळधार पावसामुळे वैभववाडी रेल्वे स्थानक परिसरातील रुळावर पाणी साचून रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता.
  • काहीकाळ विस्कळीत झालेली रेल्वेसेवा सुरळीत
  • रायगड जिल्ह्यातली कोसळधार सुरुच असून सखल भागांत पाणी.
  • महाड शहरातून वाहणारी सावित्री आणि गांधारी नदीच्या पाण्याने पूर रेषा ओलांडली.
  • महाड शहरामध्ये पूरसदृष्य परिस्थिती.
  • महाड शहरातील सखल भागात नदीचे पाणी शिरले. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
  • कोकणात धुवांधार पाऊस; नद्यांनी ओलांडली इशारा पातळी
  • राजापूरच्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली.
  • नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पावसाचा जोर
  • मोरबे धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस

उपमुख्यमंत्र्यांचा सूचना

  • महाडमध्ये 9, पोलादपूरमध्ये 13, माणगावमध्ये 1 अशी 23 गावांमधील सुमारे 1535 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
  • सुदैवाने सावित्री नदीने अद्याप धोक्याची पातळी ओलांडलेली नाही आणि ओहोटीमुळे एक मीटरने पाण्याची पातळी कमी होईल, अशी माहिती आहे.
  • 25 जवानांसह एनडीआरएफ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, सुदैवाने पाऊस थोडा कमी झाला आहे.
  • खबरदारीचा उपाय म्हणून काही खाजगी बचाव पथके सुद्धा तैनात करण्यात आली आहेत. सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या नागरिकांसाठी शाळा/समाजभवनात निवास व्यवस्था करण्यात आली आहे.
  • कुठल्याही आपातकालिन स्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि राज्य प्रशासन स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.​​​​​​

रायगडमध्ये दरड कोसळली

धुवाधार पावसामुळे कशेडी घाटातील चोळई येथे दरड कोसळली असून सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने येथील 20 कुटुंबांतील 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. सदर ठिकाणी चौपदरीकरण कामामुळे डोंगराचा कापण्यात आलेला भाग, पावसामुळे दरडीचे ढिगारेच्या ढिगारे खाली कोसळत आहेत.

मुंबईत लोकल वाहतूक सुरळीत

मुंबईतील कुर्ला-ठाणे आणि सीएसएमटी विभागात मुसळधार पाऊस झाला. तथापि मेन, हार्बर, ट्रान्सहार्बर आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर कॉरिडॉरवर लोकल वाहतूक सुरळीत आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.