
नागपूर- पत्नीवर प्रेम करता ठीक आहे, पण त्याहून अधिक फायलींवर प्रेम का करता? फायलींना दाबूदाबू का ठेवता?, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज अधिकाऱ्यांसह खासदार, आमदारांनाही कानपिचक्या दिल्या.
नागपूरमध्ये मिनकॉर्न २०२२ या तीन दिवसांच्या परिषदेला आजपासून सुरूवात झाली. यावेळी उद्घाटकीय भाषणात बोलताना विविध विकासकामांच्या फायलींना अडवून ठेवण्याच्या धोरणावर नितीन गडकरींनी अधिकारी व लोकप्रतिनिधांना चांगलेच सुनावले.
विनाकारण फाईल दाबून ठेवता
नितीन गडकरी म्हणाले, एकदा मी एका अधिकाऱ्याला थेट विचारले होते की, तुम्ही पत्नीवर प्रेम करता ते ठीक आहे. पण, फायलींवर पत्नीहून अधिक प्रेम का करता? फायलींना विनाकारण दाबून का ठेवता. फायलींना मंजूर करायचे असेल तर मंजूर करा, नामंजूर करायचे असेल तर नामंजूर करा. पण, काहीतरी त्या फायलीवर लिहा आणि निर्णय घ्या. उगीचच काम रखडवण्यात काय फायदा आहे?
लोकप्रतिनिधी अधिक जबाबदार
यावेळी नितीन गडकरींनी लोकप्रतिनिधींनाही खडेबोल सुनावले. गडकरी म्हणाले, अधिकारी फायली दाबून ठेवत असले तरी त्यासाठी ते जबाबदार नाही, तर आपण लोकप्रतिनिधी जबाबदार आहोत. कारण लोकांनी आपल्याला काम करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे त्या फायलींची जबाबदारी त्यांच्यापेक्षा अधिक आपली आहे. उद्या काही काम झाले नाही तर लोक अधिकाऱ्यांना जाब विचारणार नाही, तर लोकप्रतिनिधींना विचारतील की तुम्ही काय केले म्हणून.
काम ठप्प करण्यासाठी अधिक शक्ती
काही लोकप्रतिनिधी काम वेगाने व्हावे, यासाठी प्रयत्न न करता ते काम ठप्प कसे होईल, यासाठी अधिक शक्ती खर्च करता, अशी खंतही गडकरींनी बोलून दाखवली. गडकरी म्हणाले, एक लोकप्रतिनिधी म्हणतो काम होऊ द्या. त्याच्यानंतर दुसरा निवडून आलेला म्हणतो कामात त्रुटी आहे. काम ठप्प कसे होईल, यासाठी अनेकदा अधिक शक्ती खर्च केली जाते. तसेच, रोजगार निर्मिती होत नाहीये. राज्यात कोळशाचे उत्पादन ठप्प आहे, तर याविरोधात लोकप्रतिनिधींनी आक्रमक झाले पाहिजे. मात्र, लोकप्रतिनिधी तसे करताना फार क्वचित दिसतात, असेही गडकरी म्हणाले.