शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा वादात:मंत्रालयातल्या पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप; लेखी तक्रार नोंदवली

0
21

मुंबई –नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आता मंत्रालयातल्या पोलिस कर्मचाऱ्याला शिवागाळ केल्याचा आरोप होतोय. याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याने वरिष्ठांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर हा प्रकार समोर आला.

मात्र, आमदार संतोष बांगर यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच मंत्रालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे. सारे सत्य समोर येईल, अशी मागणीही माध्यमांशी बोलताना केली आहे.

नेमके प्रकरण काय?

शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ केल्याची लेखी तक्रार मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्याने वरिष्ठांकडे नोंदवली आहे. 27 ऑक्टोबरची ही घटना आहे. या दिवशी आमदार बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह मंत्रालयाच्या गेटवर आले. तेव्हा पोलिस कर्मचाऱ्याने बांगर यांच्यासोबत असलेल्या पंधरा कार्यकर्त्यांच्या पासची विचारणा केली. यामुळे बांगर यांनी पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याचे समोर आले आहे.

मला ओळखले नाही का?

पोलिस कर्मचाऱ्याने कार्यकर्त्यांना एंट्री पास मागताच बांगर भडकले. तुम्ही मला ओळखले नाही का? अशी विचारणा त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याला केली आणि तिथे उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला केली. यावेळी त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळही केल्याचे समजते. त्यानंतर व्यथित झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याने अखेर वरिष्ठांकडे लेखी तक्रार दिली. या तक्रारीनंतर हा सारा प्रकार समोर आला आहे.

बांगर काय म्हणतात?

आमदार संतोष बांगर यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. आपण पोलिस बांधवांशी हुज्जत घातली नाही. पोलिस कर्मचाऱ्याने मला ओळखले नव्हते. मात्र, नंतर ओळखले. त्या कर्मचाऱ्याने घाबरून लेखी तक्रार केली असावी. मी कोणताही वाद घातला नाही. त्याठिकाणी सीसीटीव्ही आहेत. ते तपासा. दूध का दूध, पाणी का पाणी होईल.

बांगर अन् वाद

आमदार संतोष बांगर आणि वाद हे समीकरण जुनेच आहे. यापूर्वी त्यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ घातल्याचा व्हिडीओ समोर आला होता. ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनाही बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी फोन करून अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा बांगर केवळ शिवीगाळ आणि हुज्जत घातल्यामुळे चर्चेत आलेत.