रेल्वे स्थानकाजवळ दुचाकींना आग

0
25

नवी मुंबई ( प्रतिनिधी) : नवी मुंबईतील मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळ दुचाकींना आग लागली. या आगीत पार्किंगमधील तब्बल ४२ गाड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन विभागाकडून आग आटोक्यात आणली जात आहे. परंतु, या भीषण आगीत गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नवी मुंबईतील मानसरोवर रेल्वे स्थानका बाहेरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना ही आग लागली. आगीत पार्किंमध्ये उभा करण्यात आलेल्या ४२ गाड्या जळून खाक झाल्या असून समाजकंटकाकडून ही आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

मुंबईमध्ये कामासाठी येणारे लोक मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर आपल्या दुचाकी पार्क करतात. आज देखील नेहमी प्रमाणे येथे दुचाकी पार्क करून अनेक जण कामावर गेले होते. परंतु, सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास या पार्किंगमध्ये आग लागली. ही आग एवढी भीषण होती की पार्किंगमधील अनेक दुचाकी या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत या दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.