
पुणे–स्वराज्य संघटनेच्यावतीने राज्यपालांना काळे झेंडे दाखवत त्यांचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न शुक्रवारी करण्यात आला. परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांनी छावणीचे स्वरुप दिल्याने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.स्वराज्य संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यात आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक !
आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा ! हा कोणता न्याय ?"स्वराज्य"चे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथे भगतसिंग कोश्यारीला काळे झेंडे दाखवले.. pic.twitter.com/9BjOuwYFkP
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 2, 2022
स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात राज्यपालांचा निषेध करण्यात आला. ‘राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा देत राज्यपालांचा निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना रस्त्यातच अडवून त्यांच्या ताब्यातील काळे झेंडे घेण्याचा प्रयत्न केला.
तसेच राज्यपालांच्या ताफ्याच्या दिशेने जाण्यासाठी त्यांना अटकाव करण्यात आला. स्वराज्य संघटनेचे जे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले त्यांना पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने ताब्यात घेतले आहे. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर विविध संघटना आक्रमक झाल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत आहे.
खासदार उदयनराजे आणि संभाजी राजे यांनी राज्यपालांच्या विधानावरून त्यांच्यावर टीका करत, त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे. राज्यपालांनी महत्त्वाच्या पदावर असताना अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात खासदार उदयनराजे आक्रमक होत त्यांनी तीन डिसेंबर रोजी किल्ले रायगड येथे आक्रोश आंदोलन आयोजित केले आहे.

राजे म्हणाले की…
युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणतात, राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक! आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा! हा कोणता न्याय?
तरीही उघड माथ्याने फिरता
संभाजीराजे पुढे म्हणतात, “स्वराज्य”चे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथे भगतसिंग कोश्यारीला काळे झेंडे दाखवले. म्हणून स्वराज्यच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून उघड माथ्याने कसे फिरत आहेत?

हा कुठला न्याय?
संभाजीराजे पुढे म्हणतात की, आमच्या दैवतांचा, महापुरुषांचा अवमान करून कोश्यारी उघड माथ्याने राज्यात फिरतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या वक्तव्याचा संविधानिक मार्गाने निषेध केला तरी पोलिस कारवाई करतात. हा कुठला न्याय आहे? असा सवाल त्यांनी केलाय.