Home Top News MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश:नवीन नियम 2025 पासून लागू होणार

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश:नवीन नियम 2025 पासून लागू होणार

0

पुणे,दि.31ः नवीन परीक्षा नियमांविरोधात आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. हे नियम दोन वर्षांनी लागू करण्याची मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्य करण्यात आली, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही माहिती देताच पुण्यात आंदोलनकर्त्या MPSC विद्यार्थ्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

नेमकी काय होती मागणी?

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन सुरु केले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा, ही प्रमुख मागणी विद्यार्थ्यांची होती. ही मागणी मान्य न झाल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा मुलांनी दिला होता.

आंदोलनात गैरप्रकार टाळण्यासाठी आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात  आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अभिमन्यू पवार हे नेतेही सहभागी झाले. राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2023 ऐवजी 2025 पासून लागू करण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यात वेळोवेळी विद्यार्थांनी एकत्रित येत आंदोलन केले आहे. यापूर्वी देखील पुण्यातील शास्त्री मार्गावर अहिल्यादेवी शिक्षण मंडळ आणि अलका टॉकीज चौकात आंदोलन करण्यात आले होते. अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.

गेल्यावेळी शास्त्री मार्गावर झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. या आंदोलनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित राहत त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता. ही मागणी सरकार पर्यंत पोहचवण्याचेही आश्वासन या नेत्यांनी दिले होते. परंतु याबाबतीत अद्याप निर्णय न झाल्याने आज मंगळवारी पुन्हा मुलांनी एकत्र येत अलका चौकात आंदोलन केले.

आजच्या आंदोलनात मागणी मान्य न झाल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला होता. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अराजकीय साष्टांग आंदोलन सुरू करण्यात आले असले तरी, या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अभिमन्यू पवार सहभागी झाले. त्यामुळे हे आंदोलन खरच अराजकीय आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

Berar Times
Exit mobile version