कौशल्य, स्टार्टअप्सच्या विकासासाठी महाराष्ट्र-भूतानमध्ये होणार आदान-प्रदान

0
8

मुंबई, दि. 9 : महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग तसेच या विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांनी स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी हाती घेतलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत. भूतान देशासाठी महाराष्ट्राच्या कौशल्य विकास आणि स्टार्टअपविषयक नाविन्यपूर्ण पद्धतींमधून शिकण्याची मोठी संधी आहे, असे प्रतिपादन भूतान नॅशनल असेंब्ल‍ीचे अध्यक्ष महामहीम श्री. वांगचुक नामग्याल यांनी केले.

वांगचुक नामग्याल यांच्या नेतृत्वाखालील भूतान देशातील 13 सदस्यीय संसदीय शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. मुंबईत आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. शिष्टमंडळात भूतानचे संसद सदस्य श्रीमती त्सेवांग ल्हामो, कर्मा गयेल्त्सशेन, जिम दोरजी, कर्मा वांगचुक, ग्येन वांगडी, श्री. उग्येन त्शेरिंग, श्रीमती लहाकी डोल्मा, श्रीमती कर्मा लहामो, भूतान नॅशनल असेंब्लीचे भाषा तज्ज्ञ लोट्ये गयेल्त्सशेन, मुख्य माहिती व माध्यम अधिकारी थिनले वांगचूक यांचा समावेश होता. याप्रसंगी कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात महाराष्ट्राची नाविन्यता परिसंस्था आणि स्टार्टअप धोरण तसेच शासनाची यासंबंधी भूमिका या विषयांवर संवाद झाला. या भेटीदरम्यान भूतान आणि महाराष्ट्र यांच्यातील कौशल्य विकास व स्टार्टअप संदर्भातील सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाने मुंबई आयआयटीस्थित बेटीक (BETIC) या आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी काम करणाऱ्या संशोधन प्रयोगशाळेला भेट देऊन तेथील स्टार्टअप्सशी संवाद साधला.

भूतानसह विविध कल्पना, उपक्रम यांचे आदानप्रदान – प्रधान सचिव मनीषा वर्मा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी राज्यातील स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. श्रीमती वर्मा म्हणाल्या की, महाराष्ट्राला भूतानच्या शाश्वतता क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींमधून बरेच काही शिकता येईल. तसेच कौशल्य आणि नावीन्यता क्षेत्रामध्ये भूतानला महाराष्ट्राच्या सर्वोत्तम पद्धतींचा लाभ होऊ शकतो. भूतानसह विविध कल्पना, उपक्रमांचे आदान-प्रदान करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे त्यांनी सांगितले.

देशात तसेच राज्यात स्टार्टअपसाठी निधीचे स्त्रोत काय आहेत, स्टार्टअपसाठी कोणकोणत्या योजना आहेत, उद्योजकता आणि नाविन्यतेच्या क्षेत्रात महिलांचा प्रतिसाद कसा मिळतो अशा विविध अनुषंगाने शिष्टमंडळातील सदस्यांनी प्रश्न विचारून यासंदर्भात महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेले धोरण, उपक्रमांची माहिती घेतली. प्रधान सचिव श्रीमती वर्मा यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. स्टार्टअपविषयक धोरणे, राज्यात स्टार्टअप्सना कशा पद्धतीने चालना देण्यात येते यासह महिला उद्योजकता कक्ष, महिला स्टार्टअप्स, ग्रामीण भागातील महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम, योजनांची माहिती श्रीमती वर्मा यांनी दिली.

श्री. वांगचूक नामग्याल यांनी राज्य शासनाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. ते म्हणाले की, भूतानसाठी भारताच्या कौशल्य आणि नाविन्यपूर्ण पद्धतींमधून शिकण्याची मोठी संधी आहे. यासाठी भविष्यात महाराष्ट्र राज्य आणि भूतान देशामध्ये परस्पर सहकार्य करता येईल, असे ते म्हणाले.