मे-जूनमध्ये उष्णतेची लाट, मराठवाडा, विदर्भ, खान्देशातील 13 जिल्ह्यांना फटका

0
30

राज्यातील बहुतेक भागात उन्हाची तीव्रता वाढली असून विदर्भातील चंद्रपूरला एप्रिलच्या प्रारंभीच कमाल तापमान चाळिशीपार गेले आहे. मंगळवारी तेथे सर्वाधिक ४०.४ तापमान नोंदवले गेले. नाशकात पारा ३५.४ वर होता. दरम्यान, आगामी चार ते पाच दिवस कमाल तापमान स्थिर राहण्याचा अंदाज हवामान माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मुसळधार पाऊस, पूर, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, गारपीट अशा संकटांच्या मालिकेनंतर राज्यावर १ मे ते १५ जून या दीड महिन्याच्या कालावधीत उष्णतेच्या लाटेचे मोठे संकट येणार आहे. चार वर्षांपेक्षा राज्याला यंदा उष्णतेच्या लाटेचा मोठा तडाखा बसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून १५ एप्रिलनंतर ऊन जाणवू लागेल. या संकटाचा सामना करण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयारी चालवली आहे.

१५ एप्रिलनंतर पारा वाढणार, चार वर्षांच्या तुलनेत अधिक ऊन

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांतील काही भाग तसेच जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण होते. कोकण, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे या जिल्ह्यांत उन्हाची तीव्रता वाढली होती. पश्चिम महाराष्ट्रातही उन्हाचा तडाखा जाणवत होता. चंद्रपूर व काही भाग वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यांत तापमान ३९ अंशांच्या दरम्यान होते.

राज्यात निवडक शहरांतील मंगळवारचे कमाल तापमान
चंद्रपूर ४०.४
सोलापूर ३९.७
अकोला ३९.६
वर्धा ३९.५
अमरावती ३९.४
वाशिम ३९.२
नागपूर ३८.८
यवतमाळ ३८.५
जळगाव ३८.५
नांदेड ३८.४
जालना ३८.०
गोंदिया ३८.०
धाराशिव ३७.८
बीड ३७.५
छत्रपती
संभाजीनगर ३६.७
पुणे ३६.६
बुलडाणा ३६.५
नगर ३६.१
मुंबई ३१.४.

लातूर, नांदेड, जळगाव जिल्हाही तापला

मराठवाडा, विदर्भ, खान्देशातील जिल्ह्यांवर जास्त परिणाम राज्यातल्या ३६ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यांमध्ये दरवर्षी उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो. यात नागपूर व अमरावती विभागांचा प्रामुख्याने समावेश आहे. यंदा मराठवाड्यात लातूर, नांदेड, तर खान्देशात नंदुरबार, जळगाव जिल्ह्यास उष्णतेचा अधिक तडाखा बसणार आहे.

लाट कशी मोजतात ?

​​​​​​​सपाट भागात सरासरी चाळीस अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान झाले तर उष्णतेची लाट समजतात. समुद्रकिनारपट्टीच्या भागात आर्द्रता जास्त असल्याने ३७ अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान झाले तर उष्णतेची लाट गणली जाते. डोंगराळ भागात तीन अंश सेल्सियसपेक्षा तापमान जास्त झाले तर उष्णतेची लाट नोंदली जाते. आजचे तापमान किती आहे यापेक्षा मागील काही वर्षांची सरासरी काढून आजच्या दिवशी किती तापमान अपेक्षित होते हे लक्षात घ्यावे लागते. एखाद्या दिवशी अपेक्षित तापमानापेक्षा साडेचार अंश सेल्सियसने तापमान वाढले तर उष्णतेची लाट समजली जाते.