नवी दिल्ली-जम्मू-काश्मीरसह चार राज्यांचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दुसरीकडे मलिक यांच्या समर्थनार्थ पश्चिमी उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानमधून अनेक खाप चौधरी आले होते. सत्यपाल मलिक त्यांच्यासाठी जेवण बनवत होते. तेवढ्यातच पोलिसांनी समर्थन करणाऱ्यांचा मंडप हटवला आणि सर्वांना ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी अनेक खाप चौधरी आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नेल्याचे सांगण्यात येत आहे. सत्यपाल मलिक यांना प्रथम आरके पुरम आणि नंतर छावला पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, सेक्टर-12 पार्कमध्ये परवानगीशिवाय एक कार्यक्रम सुरू होता. तो थांबवल्यावर सत्यपाल मलिक तेथून निघून गेले. मात्र नंतर त्यांनी स्वतः आरके पुरम पोलिस ठाणे गाठले.

अमित शहा म्हणाले – मलिक यांची विश्वासार्हता नाही
सत्यपाल मलिक यांनी अलीकडेच दावा केला होता की, पुलवामा हल्ला केंद्र सरकारच्या चूकीमुळे झाला आहे. शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांनी सत्यपाल मलिक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. इंडिया टुडेच्या राऊंड टेबल कार्यक्रमात सत्यपाल मलिक यांच्या खुलाशाशी संबंधित प्रश्नांवर शहा म्हणाले की, तुम्ही त्यांना विचारा की, आमची साथ सोडून गेल्यानंतरच त्यांनाया सर्व गोष्टी कशा काय आठवतात. लोक सत्तेत असल्यावर त्यांची अंतरात्मा कशी जागी होत नाही. सत्ता सोडल्यावरच कसा विवेक जागा होतो. असा प्रश्न शहा यांनी उपस्थित केला. मलिक यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शाह म्हणाले की, जनतेने याचा विचार करायला हवा.
केंद्राने नाही, सीबीआयने पाठवला समन्स
पुलवामावरील वक्तव्यामुळे सीबीआयने मलिक यांना समन्स बजावल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेस आणि आप नेत्यांनीही याप्रकरणी केंद्र सरकारला घेरले. यावर अमित शहा म्हणाले की, सत्यपाल मलिक यांना पाठवलेले समन्स केंद्र सरकारचे नसून सीबीआयचे होते. यापूर्वीही सीबीआयने त्यांना दोन ते तीन वेळा समन्स बजावले आहेत. अशी विधाने करून जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेत नसतानाच विवेक का जागतो, असे ते म्हणाले.
काय म्हणाले होते सत्यपाल मलिक
- एका मुलाखतीदरम्यान, पुनर्गठन आणि पुलवामा हल्ल्याच्या वेळी जम्मू आणि काश्मीर राज्याचे राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांनी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख केला. त्यांनी असा दावा केला होता की, एवढा मोठा ताफा कधीच रस्त्याने जात नाही आणि म्हणून सीआरपीएफने गृह मंत्रालयाकडे विमान उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, ती नाकारण्यात आली. सीआरपीएफला फक्त पाच विमानांची गरज असल्याचे मलिक यांनी म्हटले होते.
- ते म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी मला जिम कॉर्बेटकडून फोन केला आणि आमच्या चुकीमुळे हे घडल्याचे सांगितले. यावर पंतप्रधानांनी मला शांत राहण्यास सांगितले. कोणालाही काहीही बोलू नका. सत्यपाल मलिक यांनी एनएसए अजित डोवाल यांचा उल्लेख करत म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीत फायदा घेण्यासाठी सरकार पाकिस्तानवर दोषारोप करणार असल्याचे समजले होते.
मलिक म्हणाले- विमा घोटाळ्यात CBI ने चौकशीसाठी बोलावले
- रिलायन्स इन्शुरन्स प्रकरणात सीबीआय आपली चौकशी करू इच्छिते, असे मलिक यांनी शुक्रवारी सांगितले. त्यांना अकबर रोड गेस्ट हाऊसमध्ये बोलावण्यात आले आहे. मी राजस्थानला जात आहे, त्यामुळे सीबीआयला 27 ते 29 एप्रिलची तारीख दिली आहे, असेही ते म्हणाले.
- मलिक यांनी दावा केला होता की, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना दोन फाईल्स मिटवण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती. यातील एक फाइल राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) च्या नेत्याशी संबंधित होती. तर दुसरा अंबानीशी संबंधित होती. याप्रकरणी सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.