Home Top News कोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय धुमशान

कोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय धुमशान

0

रत्नागिरी:-कोकणात आज राजापूर तालुक्यातील नियोजित बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय धुमशान पाहायला मिळणार आहे.रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. ठाकरे गटाने त्यासाठी जोरदार तयारी केलीय. दरम्यान, त्यांच्या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापणार आहे.

कोकणात बारसू प्रकल्प नको, अशी येथील जनतेची मागणी आहे. राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरातील स्थानिक नागरिकांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला तीव्र विरोध केला होता. यावेळी त्यांनी तीन दिवस आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनकांवर पोलिसांनी बळाचा वापर केला. तर अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे आंदोलन चिघळले होते. पोलिसांनी धरपकड करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना ताब्यात घेतले होते. तर काही आंदोलक नेत्यांना अटक केली होती. त्यामुळे या आंदोलनात ठाकरे गटाने उडी घेतली.

दुसरीकडे बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ भाजप नेते आणि मंत्री नारायण राणे हेही महामोर्चा काढणार आहेत. यात राणेंसोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि राणे यांचे दोन्ही चिरंजीव नीलेश आणि आमदार नितेश राणे सहभागी होणार आहेत. त्यामुळे बारसूत ठाकरे आणि राणे आमनेसामने उभे ठाकलेले पाहायला मिळतील. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Exit mobile version