
बुलडाणा-बुलडाणा बस अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण अपघातामागील कारण काय? हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, तपासात एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अपघातग्रस्त बस चालवणाऱ्या चालकाच्या रक्ताच्या नमुन्यात 30 टक्क्यांहून अधिक अल्कोहोल आढळले आहे. त्यामुळ बसचालक मद्यधुंद असल्याने हा अपघात तर झाला नाही ना?, असा संशय व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे बस अपघात 30 जून आणि 1 जुलैच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास झाला होता. त्यानंतर फॉरेन्सिक टीमने दुसऱ्या दिवशी दुपारी बसचालकाच्या रक्ताचे नमुने घेतले होते. त्यामुळे एवढ्या कालावधीत रक्तात अल्कोहोलचे प्रमाण कमी झाले असावे. अपघात घडला त्यावेळेस ड्रायव्हरच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आले, त्यापेक्षा अनेक पटीने जास्त असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टायर फुटल्याने अपघात नाही
समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला होता. यात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. बसचालक शेख दानिश याने सुरुवातीला बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले होते. प्रादेशिक परिवहन विभागाने टायर फुटल्यामुळे अपघात झाला का?, याचा तपास केला. त्यासाठी टायरच्या खुणा आणि नमुनेही तपासण्यात आले. पण रस्त्यावर टायर फुटल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे ही शक्यता फेटाळण्यात आली आहे.
सामान्यत: किती असते अल्कोहोल
दरम्यान, अपघातानंतर 1 जुलैरोजी बसचालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्याचा फॉरेन्सिक अहवाल आता समोर आला आहे. या अहवालात बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल असल्याचे निष्पन्न झाले आहे. अमरावतीच्या रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (RFSL) येथे केलेल्या तपासणीनुसार अपघाताच्या दिवशी गोळा केलेल्या चालकाच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल 30 टक्क्यांपेक्षा जास्त होते. सामान्यत: मानवी शरीराच्या 100 मिलिलीटर रक्तात 30 मिलीग्राम एवढे अल्कोहोल असते. त्यापेक्षा अधिक असल्यास ते मर्यादेपेक्षा अधिक समजले जाते. बसचालकाच्या रक्तात 30 टक्क्यांहून अधिक अल्कोहोल आढळले आहे.
23 मृतदेहांचे डीएनए अहवाल समोर
बस अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. प्रवाशांचा अक्षरश: कोळसा झाल्याने त्यांची ओळख पटवणेही कठीण झाले होते. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली आहे. यातील 23 मृतदेहांचे डीएनए अहवाल समोर आले असून अद्याप दोन मृतदेहांचे अहवाल प्रलंबित आहेत.