
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने पश्चिम घाटातील निसर्गात वास्तव्य करणाऱ्या सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. तेजस उद्धव ठाकरे आणि हर्षिल पटेल यांच्या नेतृत्वातील चमूने पश्चिम घाटात सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. ‘सह्याद्रीओफिस उत्तराघाटी’ असे नाव या नव्या प्रजातीला देण्यात आले आहे. तेजस ठाकरे आणि हर्षिल पटेल यांच्यासह कॅम्पबेल, झीशान मिर्झा यांचाही टीममध्ये समावेश होता.पश्चिम घाटासाठी वापरला जाणारा ‘सह्याद्री’ हा संस्कृत शब्द आणि ‘ओफिस’ म्हणजे सापासाठी वापरला जाणारा ग्रीक शब्द विलीन करून हे नाव देण्यात आले आहे. या प्रजातीला ‘उत्तराघाटी’ असे नाव देण्यात आले आहे. ज्यात ‘उत्तरा’ म्हणजे ‘उत्तर दिशा दर्शविणारी’ आणि ‘घाटी’ हा पर्वत/घाटातील रहिवास अशा संदर्भातून आलेला शब्द आहे. हे नामकरण प्रजातींचे घाटातील उत्तरेकडे असलेला निवास दर्शवते. हा अभ्यास आपल्याला घाटांच्या जैवविविधतेबद्दल समजून घेण्यास हातभार लावतो. हे क्षेत्र मानवजातीसाठी अद्याप रहस्यमय असल्याचे ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनने म्हटले आहे.
कुठे प्रकाशित झाला शोधनिबंध?
सापाच्या नव्या प्रजातीसंबंधीचा शोधनिबंध लंडनमधील नॅशनल हिस्ट्री म्युझियम व जर्मनीतील प्लँक इन्स्टिट्यूट या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.
तेजस ठाकरेंना वन्यजीव संशोधनाची आवड
तेजस ठाकरे यांना वन्यजीव संशोधनाची आवड आहे. ते सुरुवातीपासूनच या क्षेत्रात काम करतात. त्यांनी आतापर्यंत खेकडे, मासे, पाली आदी विविध 11 हून अधिक दुर्मिळ वन्य प्रजातींचा शोध लावला आहे.