हैद्राबाद-गोंदिया-तिरुपती विमानसेवा आठ दिवसांपासून ठप्पच
गोंदिया : येथील बिरसी विमानतळावरुन सुरु झालेली हैद्राबाद गोंदिया-तिरुपती विमानसेवा खराब वातावरण आणि कमी दृश्यतेअभावी आज 2023 या वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे रविवार (दि.31 डिसेंबर) सलग आठव्या दिवशी रद्द होती. यामुळे गोंदियाहून तिरुपती आणि हैद्राबादला जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.इंडिगो विमान कंपनीने गोंदियाच्या बिरसी विमानतळावरुन गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती या प्रवासी विमान वाहतूक सेवेला १ डिसेंबरपासून सुरुवात केली. जवळपास २१ दिवस ही सेवा सुरळीतपणे सुरु होती. पण मागील आठ दिवसांपासून खराब वातावरण व कमी दृश्यतेअभावी ही विमानसेवा ठप्प पडली आहे. डीजीसीएने ५ हजार मीटर दृश्यतेशिवाय टेकऑप आणि लॅडिंग करण्यास मनाई केली आहे. तर सध्या तीन ते साडेतीन हजार मीटर दृश्यता असल्याने विमानतळावर विमान उतरविण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे तिरुपतीहून गोंदियाला येणारे येथे उतरु शकले नाही आणि गोंदियाहून तिरुपती जाणाऱ्या विमानाचे उड्डाण सुध्दा झाले नाही.
Scheduled flight operations
Date : 31.12.2023
Airline: IndiGo Airlines
Sector: Hyderabad – Gondia
Cancelled today due to poor visibility conditions.@aairedwr— Gondia Airport (@aaigndairport) December 31, 2023
आज रविवारला सुध्दा हीच समस्या कायम होती. त्यामुळे गोंदियासह लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता आला नाही. तर अनेक प्रवाशांना आधी बुक केलेले तिकिट रद्द करावे लागले. त्यामुळे त्यांना त्यांचा नियोजित कार्यक्रम सुध्दा रद्द करावा लागला.तर इंडिगोच्यावतीनेही प्रवाशाना पाहिजे तसे सहकार्य केले जात नसल्याचे काही प्रवाशांचे म्हणने आहे. जेव्हापर्यंत दृश्यतेची अडचण दूर होणार नाही तेव्हापर्यंत ही सेवा पुर्ववत होण्याची शक्यता कमी असल्याचे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आयएलएस लागल्यानंतर दूर हाेईल अडचण
कमी दृश्यता असताना देखील विमानतळावरुन टेकऑफ आणि लॅडिंग करण्यासाठी इन्स्ट्रूमेंट लॅडिंग सिस्टम (आयएलएस) ही यंत्रणा मदतपुर्ण ठरते. बिरसी विमानतळ प्राधिकरणाने ही यंत्रणा रशिया येथून मागविली असून ती दोन महिन्यापासून येथे पडून आहे. पण यंत्रणा अद्यापही कार्यान्वित केली नाही. बिरसी विमानतळाच्या परिसरातून गेलेला परसवाडा-कामठा हा मार्ग बंद केल्यानंतरच ही यंत्रणा लावण्याचे काम सुरु केले जाणार असल्याचे बिरसी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जर आयएलएस ही यंत्रणा लवकर कार्यान्वित झाली तर ही अडचण कायमची दूर होवू शकते.