धावत्या बसने पेट घेतला; चालक व वाहकाचे प्रसंगावधान…

0
33

गडचिरोली : भंगार बसेसमुळे राज्यभरात चर्चेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहे. आज, शुक्रवारी सकाळी मुलचेरा-घोट मार्गावर धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली होती. बसच्या चालक व वाहकाने प्रसंगावधान दाखवत जंगलातच बस थांबवून प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्याच्या सूचना दिल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास मुलचेऱ्याहून गडचिरोलीला जाण्यासाठी निघालेल्या बसने( एमएच- ०७ सी-९३१६) घोट मार्गावर जंगल परिसरात अचानक पेट घेतला. सदर बाब चालक व वाहकाच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. त्यामुळे प्रवासी सुखरूप आहेत.दरम्यान, बसच्या समोरील भागाला आग लागली होती. यावेळी बसमध्ये ७-१० प्रवासी असल्याचे कळते. बसमधील ‘बॅटरी’मुळे ही आग लागल्याचे आगार व्यवस्थापकांनी माध्यमांना सांगितले. अवेळी धावणाऱ्या भंगार बसेसमुळे जिल्ह्यातील नागरिकांचे प्रचंड हाल होत असताना आता जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ येत असल्याने तात्काळ यावर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.