मृतदेहानेही केली पूर ओसरण्याची प्रतीक्षा

0
179

पुरात अडकल्याने नातेवाइकांचे फाट्यावर जागरण
बुलढाणा,दि.०३ः- जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. पूर आल्याने काही मार्गांवर वाहतूक बंद झाली. तर पळसखेड फाटा येथे एका मृतदेहासह नातेवाइकांना तब्बल दहा तास पूर ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली. ३ ते ४ सप्टेंबरच्या रात्रीपासून सकाळपर्यंत हा प्रसंग घडला.
तालुक्यातील पळसखेड भट ते फाटादरम्यान असलेल्या नदीला ३ सप्टेंबरच्या सायंकाळी पूर आला होता. यामुळे गावकऱ्यांचा गाव आणि लगतच्या गावांशी संपर्क तुटला. रात्री पावसाचा जोर वाढल्याने पळसखेड तलावाच्या सांडव्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यामुळे नदीच्या छोट्या पुलावरून पुराचे पाणी पाच फूट उंचावरून वाहू लागले. हा रस्ता बंद झाला.
दरम्यान, गावातील सुरेश अवचितराव खंडागळे यांचा पुणे येथे मृत्य झाला. त्यांचा मृतदेह ३ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजता रुग्णवाहिकेद्वारे आणण्यात आला. मात्र नदीला पूर आल्याने अडकून पडावे लागले. पाण्याचा प्रवाह वाढतच असल्याने अखेर मृतदेह फाट्यावर असलेल्या एका घरात ठेवण्यात आला. तब्बल १० तासांनी पूर ओसरला. तरीही गुडघाभर पाण्यातून गावकऱ्यांनी सुरेश खंडागळे यांचे शव घरापर्यंत नेले. पुरात अडकून पडल्यामुळे फाट्यावर नातेवाइक आणि गावकऱ्यांना जागरण करावे लागले.