राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आयुर्वेद निसर्ग चाचणीने प्रकृती परिक्षण अभियानाला सुरुवात !

0
16

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले राष्ट्रपतींचे स्वागत!

बुलढाणा, दि. 27: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आयुर्वेद निसर्ग चाचणीने प्रकृती परीक्षण अभियानाला देशभरात सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते. हा आयुर्वेद निसर्ग चाचणी अभियान पुढील एक महिना संपूर्ण देशात चालणार आहे.

देशामध्ये आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार होण्याच्या दृष्टीकोनातून ‘हर घर आयुर्वेद निसर्ग चाचणी (प्रकृती परिक्षण) अभियान’ देशात राबविण्याचा संकल्प केंद्रीय आयुष (स्वतंत्र कार्यभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हाती घेतला आहे. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून हे अभियान संपूर्ण देशात राबविल्या जाणार आहे. या अभियानाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आयुर्वेद निसर्ग चाचणीने करण्यात आली.

‘हर घर आयुर्वेद’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प या अभियानातून साकारल्या जाणार आहे. हे अभियान 26 नोव्हेंबर पासून संपूर्ण देशात सुरू झाले असून पुढील एक महिना हे अभियान देशात राबविल्या जाणार आहे. या अभियानाची सांगता 25 डिसेंबरला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती दिनी होणार आहे. या अभियानामध्ये चार लाख पेक्षा जास्त आयुर्वेदचे शिक्षण घेणारे विद्यार्थी डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून एका महिन्यामध्ये एक कोटी नागरिकांची आयुर्वेद निसर्ग चाचणी (प्रकृती परिक्षण) करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. हे परिक्षण करताना आधुनिक तंत्रज्ञानाचाही उपयोग घेण्यात आला आहे.

या अभियानामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना त्यांच्या आयुर्वेद चाचणी अहवालानुसार मोबाईलवर आरोग्य संदर्भातील माहिती देण्यात येणार आहे. देशातील हा अभिनव प्रयोग आयुर्वेद निसर्ग उपचारासाठी नवीन दालन उपलब्ध करून देणारा ठरणार आहे, अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केली आहे.