गोंदिया,दि.११: नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात अस्तित्वासाठी झालेला वाघांचा थरार जिल्ह्यासह राज्यातील पर्यटकांनी अनुभवला असताना आता वन्यजीव प्रेमींसाठी नागझिऱ्यातून खुशखबर आली आहे. गेल्या दिड वर्षांपूर्वी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलेल्या NT-2 वाघिणीने तीन छाव्यांना जन्म दिले असून आपल्या आईसह रानगव्याच्या शिकारीनंतरचा फोटो ट्रॅप कॅमेर्यात कैद झाले आहे. त्यामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे व्याघ्र संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना काहीप्रमाणात यश आले आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये NT-1 व NT-2 ह्या वाघीनीला 20 मे 2023 रोजी तर दुसऱ्या टप्प्यामध्ये NT-3 या वाघीनीला 11 एप्रिल 2024 ला नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे निसर्गमुक्त करण्यात आले होते. त्यामध्ये NT-2 वाघिणीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये आपली जागा निर्माण केली.
सद्यास्थितीमध्ये ट्रॅप कॅमेराद्वारा NT-2 वाघिणीच्या हालचालीवर संनियंत्रण करण्यात येत आहे. सदर ट्रॅप कॅमेरामध्ये NT-2 वाघिणीचे प्रथमतःच तिच्या 3 छाव्यांसोबत रानगव्याच्या शिकारीवर फोटो व्याघ्र प्रकल्पाला प्राप्त झाले आहे.सद्या निसर्गमुक्त केलेल्या 3 वाघीनीपैकी 2 वाघीनीनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात (गाभा व बफर) आपला अधिवास निर्माण केला आहे.NT-2 वाघिणीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी VHF/GPS कॉलर आणि कॅमेरा ट्रॅप यासारखी आधुनिक साधने वापरण्यात आली आहेत.