प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन

0
42

मुंबई:-प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे आज सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. बेनेगल किडनीच्या समस्येने त्रस्त होते. अलीकडे काही दिवसांपूर्वीच त्यांनी ९० वा वाढदिवस साजरा केला. १४ डिसेंबर रोजी त्यांनी ९० वा वाढदिवस साजरा केला होता, यावेळी त्यांचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. बेनेगल यांच्या महत्त्वपूर्ण योगदानात ‘अंकुर’, निशांत’ या चित्रपटांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी दिवगंत राज कपूर यांची १०० वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी आयोजित आरके चित्रपट महोत्सवात त्यांचे उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित करण्यात आले होते.

चित्रपटांमध्ये कोणताही धांगडधिंगा न दाखवता तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा दिग्गज दिग्दर्शक म्हणून श्याम बेनेगल यांची ओळख होती. त्यांनी चित्रपटांमधून मांडलेली कथा, मुद्दे हे खरंच विचार करायला लावणारे आणि सुन्न करणारे असायचे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अंकुर’ चित्रपटाची तर संपूर्ण जगाला दखल घ्यावी लागली होती. सामाजिक मुद्द्यांवर चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे भाष्य करणाऱ्या कलाकाराचे आज निधन झालं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जाणाऱ्या बेनेगल यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. समांतर चित्रपटसृष्टीचे प्रणेते असणाऱ्या बेनेगल यांनी मुख्य प्रवाहातील सिनेमे, तसेच आर्ट फिल्म्सच्या माधम्यातून वास्तववाद, सखोल अभ्यास आणि कथाकथनाची उत्कृष्टता दाखवून दिली. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपट सृष्टीतील एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जाते आहे.

बेनेगल यांनी १९७० आणि १९८० च्या दशकात भारतीय समांतर चित्रपट चळवळीची सुरुवात केली. ज्याद्वारे वास्तववाद आणि सामाजिक बाबींवर भाष्य केले गेले. ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जुनून’, ‘मंडी’ यांसारखे चित्रपट भारतीय सिनेसृष्टीला देणारे हे निर्माते गेल्या शनिवारी ९० वर्षांचे झाले होते. २३ डिसेंबर रोजी मुंबईत त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं दिग्ददर्शन केलं होतं. श्याम बेनेगल यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं. त्यांना 2013 सालचा कलामहर्षी बाबूराव पेंटर जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तसेच त्यांना पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार अशा पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं होतं. त्यांना 2018 सालचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं.

वास्तववादी चित्रपट निर्मितीचे पितामह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २३ :  भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तववादी चित्रपट निर्मितीचे समांतर पर्व आणणारे, पितामह म्हणून प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल अजरामर राहतील, अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मभूषण श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

चित्रपट माध्यमाचे सामर्थ्य ओळखून भारतीय चित्रपट सृष्टीच्या विकासात, वैभवात भर घालण्याचे त्यांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्या कलाकृतींनी भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून दिली. कर्नाटक कोकणी कुटुंबातून आलेल्या दिवंगत बेनेगल यांनी छायाचित्रकार असलेल्या वडिलांनी भेट म्हणून दिलेल्या कॅमेराद्वारे वयाच्या बाराव्या वर्षीच चित्रपट निर्मितीला सुरुवात केली. अंकुर, द सिडलींग, मंथन, मंडी, जुनून यांसारख्या अनेक चित्रपटांनी भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तववादी निर्मितीचे पर्व आणले. त्यांनी माहितीपट, जाहिरात पट निर्मितीतही आपला ठसा उमटवला. यातही त्यांची लेखनशैली आणि मांडणी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. समांतर चित्रपट चळवळीला बेनेगल स्पर्श आणि विचार देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या चित्रपटातून सर्वसामान्यांचे जगणे पडद्यावर आले. सहजता हे त्यांचे वैशिष्ट्य नव्हते तर कला आणि त्यांच्या जगण्याचे ते सूत्र होते. बेनेगल यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती तर केलीच त्याचबरोबर भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक नामवंत कलाकार दिले. त्यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून अनेक कलाकार घडले. चित्रपटसृष्टीला आधुनिक वळण देणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकांच्या प्रभावळीत श्याम बेनेगल अग्रणी होते. त्यांच्या कलाकृतींचे, शैलीचा अभ्यास रसग्रहण आजही कुठे ना कुठे सुरू असते, हीच त्यांच्या कलाविष्काराची महत्ता आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा एक मार्गदर्शक अध्वर्यू काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने चित्रपट निर्मिती, कला क्षेत्राचे भरून न निघणारी हानी झाली आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.