छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक;१२ नक्षलवाद्यांचा खात्मा

0
154
file photo

रायपूर:– छत्तीसगडच्या बिजापूरच्या जंगलात आज सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक चालू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाने संध्याकाळपर्यंत १२ नक्षलावाद्यांना ठार केलं आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजापूर आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या जंगलात सुरक्षादलाकडून नक्षलवाद्यांविरोधात मोठी मोहीम राबवली जात आहे. यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये थांबू-थांबून गोळीबार केला जात आहे.

बिजापूरमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. तेलंगणाच्या सीमेवरील अनेक गावांमध्ये नक्षलवाद्यांवर कारवाई सुरू आहे.याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून एसएलआरसह अनेक हायटेक शस्त्रेही जप्त केली आहेत. DRG विजापूर, DRG सुकमा, DRG दंतेवाडा, कोब्रा 204, 205, 206, 208, 210 आणि CARIPU 229 बटालियनचा या ऑपरेशनमध्ये सहभाग आहे. या सर्व बटालियनचे सैनिक नक्षलवाद्यांविरोधात मोठ्या कारवाया करत आहेत.

अजूनही विजापूरमधील मरुधबाका आणि पुजारी कांकेर भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सध्या लपून बसलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात आहे. छत्तीसगडमधील विजापूर येथील कुत्रू जंगलात 6 जानेवारी रोजी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनाला भूसुरुंग लावून उडवले होते. या दुर्दैवी घटनेत 8 जवान शहीद झाले, तर एका चालकाचाही मृत्यू झाला होता. हे सर्व सैनिक अबुझमद भागात नक्षलविरोधी अभियान राबवून परतत होते. आता अखेर दहा दिवसांतच सुरक्षा दलांनी आपल्या साथीदारांच्या बलिदानाचा बदला घेतला आहे.