UPI Transactions | देशातील डिजिटल व्यवहारांचा कणा असलेल्या UPI (यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) यंत्रणेत मोठा बदल होत असून, लवकरच युजर्सना जलद सेवा मिळणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने दिलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 16 जून 2025 पासून UPI व्यवहार फक्त 15 सेकंदांमध्ये पूर्ण होतील. यामुळे व्यवहार करताना वेळ वाचेल आणि अयशस्वी व्यवहारांचे प्रमाण कमी होईल.
NPCI ने 26 एप्रिल रोजी सर्व बँका आणि पेमेंट अॅप्सना पत्र पाठवून नवीन प्रक्रिया अंमलात आणण्याच्या सूचना दिल्या. सध्या UPI द्वारे दरमहिना 25 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे व्यवहार होतात. त्यामुळे यंत्रणेला अधिक कार्यक्षम आणि वेगवान बनवणे अत्यंत गरजेचे ठरत होते. नवीन नियमानुसार, ‘रिक्वेस्ट पे’ आणि ‘रिस्पॉन्स पे’ सेवा 15 सेकंदांच्या आत पूर्ण होणार आहेत. तसेच, व्यवहार स्थिती तपासण्यासाठी आणि व्यवहार रिव्हर्सलसाठी प्रत्येकी 10 सेकंदांचा कालावधी राखण्यात आला आहे. NPCI च्या मते, यामुळे वापरकर्त्यांचा अनुभव अधिक सुलभ होईल आणि व्यवहार अडथळ्याशिवाय पूर्ण होतील.
डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी बँकांना आणि पेमेंट अॅप्सना त्यांची प्रणाली वेळेत अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये Google Pay, PhonePe, Paytm, BHIM, Amazon Pay आणि WhatsApp Pay यांचा समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये UPI व्यवहारांमध्ये अडथळे आले होते. 12 एप्रिल, 1 एप्रिल आणि 26 मार्च रोजी काही वेळ UPI सेवा ठप्प झाली होती. यामुळे युजर्सना व्यवहार अयशस्वी होण्याचा अनुभव आला होता. NPCI च्या तपासणीत, जुन्या व्यवहारांबाबत बँकांकडून वारंवार रिक्वेस्ट्स केल्या गेल्यामुळे API वर ताण निर्माण झाला होता आणि संपूर्ण प्रोसेसिंग यंत्रणा मंदावली होती.
याच पार्श्वभूमीवर NPCI ने ही सुधारणा करत सिस्टमला अधिक स्मार्ट, वेगवान आणि विश्वासार्ह बनवण्याचा निर्णय घेतला आहे. UPI ही भारतातील सर्वाधिक वापरली जाणारी डिजिटल पेमेंट प्रणाली असून, यामध्ये वेळेवर सेवा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.