जळगावच्या अमळनेरमध्ये मालगाडी रेल्वे रूळावरून घसरली

0
8

जळगाव:-जळगावच्या अमळनेरमध्ये आज मोठी दुर्घटना घडली आहे. अमळनेर स्थानकाजवळ एक मालगाडी रेल्वे रुळावरुन खाली घसरली. हा अपघात इतका मोठा होता की, जवळपास मालगाडीचे पाच ते सहा डब्बे रेल्वे रुळावर अस्ताव्यस्त झालेले बघायला मिळाले. विशेष म्हणजे घटना घडली तिथे बाजूलाच अमळनेरमधील प्रसिद्ध प्रताप महाविद्यालय आहे. ही घटना घडली तेव्हा समोरुन दुसरी रेल्वे गाडी आली असती तर दुर्घटना घडण्याची शक्यता होती. कारण या अपघातात आजूबाजूच्या रेल्वे रुळाचंदेखील नुकसान झालं आहे.

भुसावळहून नंदूरबारच्या दिशेला मालगाडी निघाली होती. या दरम्यान अमळनेर स्थानकाजवळ मालगाडीचे पाच ते सहा डब्बे रेल्वे रुळावरुन खाली घसरले. या अपघातामुळे सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती आहे. या अपघातात सुदैवाने लोको पायलट आणि गार्ड सुरक्षितपणे बचावले आहेत. संबंधित घटना ही आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. ही घटना अमळनेर रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर घडली. यामुळे तातडीने घटनास्थळी अधिकाऱ्यांनी धाव घेतली. या घटनेनंतर तातडीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. हा अपघात नेमका कसा झाला? याची सखोल माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या अपघाताचे फोटो देखील समोर आले आहेत.

या फोटोंमध्ये मालगाडीचे डब्बे अस्ताव्यवस्थ झालेले बघायला मिळाले आहेत. त्यामुळे अपघात किती मोठा होता याचा प्रत्यय येतो. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातानंतर वाहतूक सुरळीत होण्यास बराच विलंब होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवासी रेल्वेला देखील याचा फटका बसणार आहे. सुरत-भुसावळ महामार्गाने दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या मार्गाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्या प्रचंड गर्दीने भरलेल्या असतात. जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील लाखो नागरीक सुरत येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे दररोज हजारो प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. पण आता अपघातामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. दरम्यान, दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.