अलिबागजवळील समुद्रात संशयास्पद बोट?पोलीस यंत्रणा अलर्ट

0
43

ठिकठिकाणी नाकाबंदी; झाडाझडती सुरू

रायगड:-रायगडमधील अलिबागजवळच्या कोरलई समुद्रात संशयास्पद बोट आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकाराने जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या असून ठिकठिकाणी नाकाबंदी आणि झाडाझडती सुरु करण्यात आली आहे. बोटीमधून काही लोक उतरल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोरलई इथं खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली. यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे. ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या बोटीतून काही व्यक्ती उतरल्याचा संशय असून पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे.रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. रायगड पोलीस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बाँब शोधक आणि नाशक पथक अशा सर्व यंत्रणा पोहोचल्या. संशयास्पद ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली.

कोरलईच्या लाईट हाऊसपासून साधारण दोन नोटिकल मैल अंतरावर ही बोट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या सर्व घटने बाबत पोलिस यंत्रणा काहीही बोलायला तयार नाही. जिल्हा प्रशासन देखील चुप्पी साधून आहे. दरम्यान, स्थानिक मच्छिमारांना घेऊन पोलिसांनी समुद्रात रात्री उशीरा पर्यंत कॉम्बिग ऑपेरेशन केले. समुद्रात काही अंतरावर बोटीवरील दिवे दिसून आले. परंतु बोटीच्या जवळ जाण्याच्या प्रयत्न केला त्यानंतर मात्र बोट समुद्रावर दुरपर्यंत दिसून आली नाही. पहाटे चारपर्यंत यंत्रणा शोध घेत होती, सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.