
चेन्नई – न्यायालयाचे वार्तांकन करत असताना खटल्यासंबंधित वकिलांचे नाव प्रसिद्ध करू नये, असे मत मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुरै खंडपीठाने नोंदविले. तसेच याबाबत उच्च न्यायालयांच्या रजिस्ट्रारना याबाबत सूचनाही करण्यात आली. वकिलांचे नाव प्रसिद्ध करून अप्रत्यक्षपणे त्यांच्या व्यवसायाची प्रसिद्धी होत असते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
न्या. नूटी राममोहन राव व एस. एस. सुंदर यांच्या खंडपीठाने पत्रकारांना त्यांच्या न्यायालयीन वार्तांकनादरम्यान अत्यावश्यक स्थिती वगळता वकिलांचे नाव प्रसिद्ध न करण्याबाबत सूचना केली.
पुथिया तमिलग्राम पक्षाशी संबंधित ऍड. एस. भास्कर मथुराम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्ता वकील प्रसिद्धीचा फायदा घेत असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यानंतर उच्च न्यायालयाने याबाबत रजिस्ट्रारना निर्देश देत तमिळनाडू व पदुच्चेरी बार कौन्सिलला संबंधित वकीलावर व्यावसायिक गैरवर्तन व आचारसंहितेअंतर्गत सहा महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
न्यायाधीशांची नावेही छापू नका
याचिकेवरील सुनावणीदरम्यान खंडपीठाने न्यायाधीशांचे नाव छापण्यासही विरोध दर्शविला. “”उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सरन्यायाधीशांनी नेमून दिलेल्या चौकटीत काम करत असतो. त्यामुळे न्यायाधीशांची नावेही माध्यमांनी प्रसिद्ध करू नये. त्या ऐवजी फक्त न्यायालयाचे नाव प्रसिद्ध करावे, अशी विनंती माध्यमांना करावी,‘‘ अशा सूचना खंडपीठाने रजिस्ट्रारना केल्या.