नागपूर दि.१५: पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा बीटात पुन्हा एका वाघाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी जंगल सफारी करणाऱ्या काही पर्यटकांना कम्पार्टमेंट क्र. ६६९ मध्ये रस्त्याच्या बाजूला वाघ मृतावस्थेत आढळून आला. महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.दोन वाघांच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.पर्यटकांनी लगेच वन विभागाच्या गेटवरील वन कर्मचाऱ्यांना माहिती दिली. दुपारी प्रकल्पाचे क्षेत्र संचालक ऋषिकेश रंजन यांच्यासह डॉ. कडू, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी प्रफुल्ल भांबूरकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाचे प्रतिनिधी कुंदन हाते व अन्य वरिष्ठ वन अधिकारी घटनास्थळी पोहोचले.