Home Top News नक्षल्यांकडून भरबाजारात युवकाची हत्या

नक्षल्यांकडून भरबाजारात युवकाची हत्या

0

गडचिरोली, दि.२२: नक्षल्यांनी आज धानोरा तालुक्यातील पेंढरी उपपोलिस ठाण्यांतर्गत झाडापापडा येथे कोंबडा बाजारात एका युवकाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना मंगळवार दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. सुनील तिलकबापू पवार असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मंगळवार झाडापापडा गावाबाहेरील जंगलात कोंबडाबाजार भरला होता. तेथे काही साध्या वेशभूषेतील नक्षली आले आणि त्यांनी सुनील पवार याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. त्यानंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले. या घटनेत शेजारी उभे असलेले सदाराम ठाकूर व रवींद्र कुसराम हे दोघे जखमी झाले. सदारामच्या कानाला, तर रवींद्रच्या हाताला गोळी चाटून गेली. दोघांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.गेल्या पाच-सहा महिन्यांपासून नक्षल्यांच्या कारवाया थंडावल्या होत्या. परंतु आता त्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. रविवारी(१९) रात्री भामरागड तालुक्यातील लाहेरीटोला येथील जैनी परसा या महिलेवर गोळ्या घालून तिला नक्षल्यांनी जखमी केले. त्यानंतर आज भरदिवसा झाडापापडा येथील युवकाची हत्या केली.

Exit mobile version