गृहमंत्र्याच्या नागपूरात खंडणीसाठी व्यापाऱ्याला जिवंत जाळले

0
11

नागपूर,दि.23 : एक कोटी रुपयाच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या लॉटरी व्यापारी सुरेश आग्रेकर यांचा मुलगा राहुलचा बुटीबोरी येथे निर्घृण खून करण्यात आला. अपहरणकर्त्यांनी पाच तासाच्या आतच त्याचा खून केला. यानंतर ओळख लपविण्यासाठी मृतदेहाला आग लावली. बुधवारी दुपारी मृतदेहाजवळ सापडलेला पर्स, चाव्याचा गुच्छा, गळ्यातील लॉकेट आणि ब्रँडेड जीन्सच्या आधारावर मृतदेह राहुलचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु राहुलच्या कुटुंबीयांना ते मान्य झाले नाही. त्यांचे म्हणणे होते की, वस्तू राहुलच्या आहेत मात्र त्याची शरीररचना राहुलसारखी नाही. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी राहुलच्या घरी गेले. त्याच्या कुटुंबीयांसोबत प्रदीर्घ चर्चा केली. यानंतर रात्री उशिरा कुटुंबीयांनी मृतदेह राहुलचाच असल्याचे मान्य केले.
राहुल सुरेश आग्रेकर (३२) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. दुर्गेश दशरथ बोकडे पंकज हारोडे व त्यांच्या साथीदाराविरुद्ध लकडगंज पोलिसांनी तूर्त खंडणीसाठी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अपहरणकर्ते फरार आहेत. राहुल याची दारोडकर चौकात जैन लॉटरी एजन्सी आहे. तो नागपूरसह विदर्भातील लॉटरी सेंटर्सना लॉटरीचा पुरवठा करायचा. दुर्गेश याचेही राणी दुर्गावती चौकात लॉटरीचे दुकान आहे. गत आठ वर्षांपासून दोघे एकमेकांना ओळखतात. दुर्गेश हा राहुल याच्याकडून लॉटरी खरेदी करायचा. काही महिन्यांपासून दोघांमध्ये पैशाचा वाद सुरू होता. दुर्गेशने पंकजच्या मदतीने राहुल याच्या अपहरणाचा कट आखला. मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास दुर्गेश व पंकज एमएमच-४९-बी-७७४४ या क्रमांकाच्या बोलेरोने दारोडकर चौकात आले. याचवेळी राहुल घराबाहेर आला व बोलेरोमध्ये बसला. तिघेही लाकडापूलमार्गे तेथून समोर गेले.
दरम्यान, सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास राहुलने त्याची पत्नी अर्पिता यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘दीड तासात घरी परत येतो’, असे राहुलने पत्नीला सांगितले. दुपारी २ वाजताच्या सुमारास राहुलचा मोठा भाऊ जयेश यांच्या मोबाइलवर राहुलच्या मोबाइलवरून फोन आला. ‘राहुलचे अपहरण करण्यात आले आहे. तो जिवंत हवा असेल तर एक कोटीची खंडणी दे’, असे मोबाइलवरून बोलणाऱ्याने सांगितले. हा आवाज दुर्गेशचा होता.