शिष्यवृत्ती घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा-विजय वडेट्टीवार

0
6

गडचिरोली – गडचिरोलीसह राज्यात 2000 कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा उजेडात आला. या प्रकरणाचा तपास अतिशय संथगतीने सुरू आहे. आरोपींना सहजतेने जामीनही मिळत आहे. कोट्यवधी रुपये हडपणारे आरोपी समाजात खुलेआम फिरत आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री, ब्रह्मपुरीचे आमदार तथा विधानसभेतील कॉंग्रेसचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून त्यांनी ही मागणी केली.

वडेट्टीवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रभाषा प्रचार ज्ञान मंडळ यांच्यामार्फत राज्यात 252 अभ्यास केंद्रांमधून 24 व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जातात. या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाला आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभागामार्फत 34 हजार 205 रुपये शिष्यवृत्ती देय आहे. याशिवाय यूजीसीच्या मान्यतेसह अभ्यासक्रमांना अनुदानही दिले जाते. मात्र, 2013-14 मध्ये अभ्यासक्रमांना मान्यता नसतानाही 252 ठिकाणी अभ्यासक्रम सुरू करून शासनाची कोट्यवधींची शिष्यवृत्ती नियमबाह्यपणे लाटण्यात आली.

2011-12, 2012-13, 2013-14 या तीन वर्षांत 33 हजार 241 बोगस विद्यार्थी दाखवून 21 हजार 196 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती उचलण्यात आली. तीन वर्षांमध्ये 67 कोटी 67 लाख 12 हजार 180 रुपयाचे वाटप करण्यात आले. चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यात 17 कोटी 35 लाख 90 हजार 375 रुपयाचे वाटप करण्यात आले. यात समाजकल्याण विभागाच्या एका सहायक आयुक्ताने 13 कोटी 82 लाख 22 हजार 405 रुपयांचे वाटप एकट्याने केले आहे.